एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 20:27 IST2024-10-11T20:16:00+5:302024-10-11T20:27:23+5:30
Air India Plane News: तामिळनाडूमधील त्रिची विमानतळावरून शारजाहकडे जात असलेल्या एअर इंडियाच्या विमानामध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर अथक प्रयत्नांनंतर हे विमान सुरक्षितरीत्या धावपट्टीवर उतरवण्यात यश आलं.

एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
तामिळनाडूमधील त्रिची विमानतळावरून शारजाहकडे जात असलेल्या एअर इंडियाच्याविमानामध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. उड्डाण केल्यानंतर लगेचच विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टिममध्ये काहीतरी गंभीर बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर दोन तास हे विमान विमानतळाच्या आसपास घिरट्या घालत होते. या विमानामधून सुमारे १४० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. अखेर या विमानाला विमानतळावर सुखरूप उतरवण्यात यश आले आहे.
या घटनेमुळे विमानतळावर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच संभाव्य धोका लक्षात घेऊन विमानतळावर अग्निशमन दलाच्या १८ बंबांना पाचारण करण्यात आले होते. विमानामध्ये इंधनाचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने इंधन कमी झाल्यानंतर हे विमान धावपट्टीवर उतरवण्याचा प्रयत्न केला जाणार असे सांगण्यात येत होते. अखेरीस हे विमान सुखरूप उतरवण्यात यश आलं.
विमानामधील हायड्रॉलिक सिस्टिम बिघडल्याचे निदर्शनास आल्यानंतर वैमानिकाने हे विमान त्रिची विमानतळावर उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले. वैमानिकाने पूर्ण आणीबाणीची परिस्थिती घोषित केली होती. त्यानंतर विमानतळावरील कर्मचारी या समस्येवर तोडगा काढून विमानाला सुरक्षित धावपट्टीवर उतरवून प्रवाशांना सुखरूप उतरवण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होते.