मोठी बातमी : लोकसभेसाठी भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीची तारीख ठरली, महाराष्ट्रातून कुणाचं नाव?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 11:46 AM2024-02-25T11:46:40+5:302024-02-25T11:49:32+5:30
भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या यादीत देशभरातील १०० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे.
Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने गेल्या काही महिन्यांपासून सर्व ताकद पणाला लावत तयारी सुरू केली आहे. अशातच आपल्या उमेदवारांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी भाजपकडून लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याआधीच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. २९ फेब्रुवारी रोजी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर लगेचच म्हणजे २९ फेब्रुवारी रोजी रात्री किंवा १ मार्च रोजी पक्षाकडून पहिल्या यादीत देशभरातील १०० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य असणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्या भाजप उमेदवारांचे नाव पहिल्या यादीत येते, याबाबतही उत्सुकताना निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट असणाऱ्या नेत्यांना उमेदवारांच्या पहिल्या यादीत स्थान मिळवण्याची शक्यता आहे. मात्र ज्या जागी विद्यमान खासदारांना डच्चू देत नवीन उमेदवाराला संधी द्यायची आहे, अशा ठिकाणी भाजपकडून सर्वांत शेवटी उमदेवारी जाहीर केली जाईल, असेही समजते.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात असणारे नारायण राणे, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे यांचा समावेश भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत असू शकतो.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीत कोणकोणत्या नेत्यांचा समावेश?
जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)
पंतप्रधान नरेंद्र मोदी
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
गृहमंत्री अमित शाह
सत्यनारायण जातिया
भूपेंद्र यादव
देवेंद्र फडणवीस
के लक्ष्मण
इक्बाल सिंग लालपुरा
सुधा यादव
बी.एल.संतोष
ओम माथूर
बी. एस येडियुरप्पा
सर्बानंद सोनोवाल
वनथी श्रीनिवास