केजरीवालांना मोठा दिलासा: मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठीची याचिका हायकोर्टाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 14:44 IST2024-03-28T14:44:06+5:302024-03-28T14:44:47+5:30
अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.

केजरीवालांना मोठा दिलासा: मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठीची याचिका हायकोर्टाने फेटाळली
Arvind Kejriwal ( Marathi News ) :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टातून मोठा दिलासा मिळाला आहे. कारण कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. हे राजकीय प्रकरण असून ते न्यायपालिकेच्या अखत्यारित येत नसल्याचं सांगत कोर्टाने याबाबत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सध्या तरी केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कायम राहणार आहेत.
मद्य धोरणप्रकरणी ईडीने अटक केल्यानंतरही अरविंद केजरीवाल यांनी अद्याप मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे तुरुंगात असलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रिपदावरून हटवावं, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टात एका नागरिकाकडून दाखल करण्यात आली होती. या याचिकेप्रकरणी कोर्टात आज सुनावणी झाली असून कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
अटकेप्रकरणी अंतरिम दिलासा मिळालेला नाही!
अरविंद केजरीवाल यांनी ईडीने केलेल्या अटकेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र केजरीवाल यांना काल दिल्ली हायकोर्टाने अंतरिम दिलासा देण्यास नकार देत त्यांच्या याचिकेवर ३ एप्रिलपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. केजरीवाल यांची ईडी कोठडी आज संपणार असून, त्यांना राऊज ॲव्हेन्यूच्या पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येईल. केजरीवाल यांची ईडीची कोठडी संपताच त्यांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआय सज्ज झाली आहे.
दरम्यान, दिल्लीचे सरकार तुरुंगातून चालू देणार नाही, अशी कठोर भूमिका उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी घेतली आहे. उपराज्यपालांच्या विधानामुळे दिल्लीच्या राजकारणात हालचाली वाढण्याची शक्यता आहे.