मोठा दिलासा! लोन मोरेटोरियमचे व्याज सरकार भरणार; कर्जदार सुखावले
By हेमंत बावकर | Published: October 3, 2020 11:59 AM2020-10-03T11:59:48+5:302020-10-03T12:01:05+5:30
EMI moratorium : आरबीआयने आधी तीन महिने आणि नंतर तीन असे सहा महिने ईएमआय दिलासा दिला होता. 31 ऑगस्टला ही मुदत संपली होती. याकाळात अनेकांचा कोरोना संकटामुळे रोजगार गेला होता. त्यानंतरही त्यांना नोकरी किंवा रोजगार मिळण्याची शक्यता कमीच होती. यामुळे सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने याचिका दाखल केली होती.
कोरोना काळात देशभरात लॉकडाऊन केल्यानंतर आरबीआयने लोन मोरेटोरिअम जाहीर केला होता. यामुळे या काळात नोकरी गमावलेल्या किंवा रोजगार गमावलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, बँकांनी या काळातील चक्रवाढ व्याज आकारण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे थकलेल्या ईएमआयपेक्षा कितीतरी अधिक पटींनी या व्याजाचा भुर्दंड ग्राहकांना बसणार होता. यावर आता मोठा दिलासा मिळाला आहे.
आरबीआयने आधी तीन महिने आणि नंतर तीन असे सहा महिने ईएमआय दिलासा दिला होता. 31 ऑगस्टला ही मुदत संपली होती. याकाळात अनेकांचा कोरोना संकटामुळे रोजगार गेला होता. त्यानंतरही त्यांना नोकरी किंवा रोजगार मिळण्याची शक्यता कमीच होती. यामुळे सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने याचिका दाखल केली होती. यावर केंद्राने तो बँकांचा विषय असल्याचे म्हटले होते. यावर न्यायालयाने केंद्र सरकार, आरबीआय जबाबदारीपासून पळू शकत नाहीत, असे सुनावले होते. तसेच पुढील वेळी पूर्ण नियोजन करून या, असेही सांगितले होते.
यावर केंद सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. यामध्ये बँक कर्ज आणि क्रेडिट कार्डच्या मोरेटोरियमवर अतिरिक्त व्याज माफ केले जाणार असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच एमएसएमई, एजुकेशन, होम, कंज्यूमर, ऑटो लोनवर लागू केलेले चक्रवाढ व्याज वसूल केले जाणार नाही. तसेच क्रेडिट कार्डवरील व्याजही वसूल केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या बाबतचे वृत्त आज तकने दिले आहे.
चक्रवाढ व्याजाचे गणित कसे होते?
आरबीआयच्या सूचना सर्वात आधी एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक अंमलात आणते. पण या बँकेनेच ही माहिती देऊन ईएमआय दिलासा घेऊ इच्छिणाऱ्यांची झोप उडविली होती. एसबीआयने त्यांच्या वेबसाईटवर एक लिंक दिली आहे. यावर त्यांनी हा ईएमआय दिलासा म्हणजेच न भरण्याची सूट दिल्याचे म्हटले होते. तसेच ही योजना कशी लागू होईल याबाबतही सांगितले होते. यामध्ये त्यांनी वाहन आणि गृह कर्ज अशी दोन उदाहरणे दिली आहेत.
- जर तुम्ही ६ लाखांचे वाहन कर्ज ५४ महिन्यांच्या मुदतीचे घेतले असेल आणि आरबीआयनुसार तीन महिन्यांचा दिलासा घेतला तर तुमच्या कर्जाला मुदतवाढ मिळणार आहे. तसेच या काळातील एकूण कर्जाच्या रकमेवर तब्बल १९००० रुपये व्याज आकरले जाण्याची शक्यता आहे. ही रक्कम तुमच्या कारच्या हप्त्याच्या दीड पट असणार होती.
- जर तुम्ही ३० लाखांचे १५ वर्षांच्या मुदतीचे गृहकर्ज घेतले असेल तर तुम्हाला तीन महिन्यांचे एकून कर्जाच्या रकमेचे व्याजच २.३४ लाख रुपये भरावे लागणार आहे. हे व्याज म्हणजे तुमचे घराचे ८ हप्ते असणार होती.
- एकूणच काय तर तुम्ही तीन हप्ते टाळण्यासाठी किंवा सूट घेण्याचा हव्यास धरलात तर वाहनाचे दीड महिन्याचाच EMI दिलासा मिळणार आहे. तर घराचे कर्ज असलेल्यांना तर तीन महिन्यांचे हप्ते आणि व्याजाचे ८ महिन्यांचे हप्ते असे ११ हप्ते जादा भरावे लागणार होती.