राजनाथ सिंह, विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; तीन राज्यांत पर्यवेक्षकांची नावे भाजपकडून जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 11:46 AM2023-12-08T11:46:37+5:302023-12-08T11:47:17+5:30
मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदावरून सर्वाधिक रस्सीखेच सुरु आहे. वसुंधरा राजेंनी आमदारांना गोळा करून त्यांची परेडही वरिष्ठ नेत्यांसमोर करवली होती.
भाजपाने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडेय यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदावरून सर्वाधिक रस्सीखेच सुरु आहे. वसुंधरा राजेंनी आमदारांना गोळा करून त्यांची परेडही वरिष्ठ नेत्यांसमोर करवली होती. तर एका माजी आमदाराने त्यांच्या मुलासह साठ आमदारांना राजेंनी एका रिसॉर्टमध्ये रोखल्याचा आरोप केला होता.
दुसरीकडे मध्य प्रदेशमध्येही मुख्यमंत्री पदासाठी केंद्रातून मंत्रिपद सोडून राज्यात आलेले तोमर यांच्यासह मावळते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण व महासचिव विजयवर्गीय यांची नावे चर्चेत आहेत. यामुळे दिल्लीत जोरदार बैठका सुरु झाल्या आहेत. येत्या रविवारपर्यंत तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
या निवडीनंतर अंतर्गत हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी भाजपाने तिन्ही राज्यांमध्ये पर्यवेक्षक नेमले आहेत. राजनाथ, तावडे आणि पांडेय यांच्यावर राजस्थानची जबाबदारी टाकली आहे. हरियाणा सीएम मनोहर लाल खट्टर, के लक्ष्मण, आशा लकड़ा यांना मध्य प्रदेशची जबाबदारी दिली आहे. छत्तीसगडसाठी अर्जुन मुंडा, सर्वानंद सोनोवाल आणि दुष्यंत गौतम यांची निवड करण्यात आली आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोणती नावे?
राजस्थानः मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत वसुंधरा राजे, खासदार दिया कुमारी, ओम बिर्ला, भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत आणि बाबा बालकनाथ यांची नावे आहेत.
मध्य प्रदेशः शिवराज सिंह चौहान, प्रल्हाद पटेल, नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह अनेक नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.
छत्तीसगडः छत्तीसगडमध्ये रमण सिंह, भाजप प्रदेशाध्यक्ष अरुण साओ, रेणुका सिंह आणि ओपी चौधरी यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.