Maharashtra Politics: चूक भोवली! निवडणूक आयोगाने अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद ठरवली; उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 12:26 PM2022-10-26T12:26:33+5:302022-10-26T12:27:09+5:30
Maharashtra News: केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले आणि नवे शिंदे-फडणवीस स्थापन झाले. यानंतर शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यानंतर शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले. तसेच निवडणूक आयोगाने काही कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लाखो प्रतिज्ञापत्र सादर केली. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाची तब्बल अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद ठरवल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गटाकडून शिवसेना ही आमचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून दोन ट्रक भरून प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. ठाकरे गटाने ११ लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती, असे सांगितले जात आहे.
प्रतिज्ञापत्रात चूक झाल्याने बाद ठरवली
निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विहीत नमुण्यामध्येच ही प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक होते. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून विहीत नमुण्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर न करण्यात आल्याने प्रतिज्ञापत्र बाद ठरवण्यात आली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद ठरवलेल्या प्रतिज्ञापत्रांची संख्या तब्बल अडीच लाख असल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्र बाद होणे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, खरी शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचं चिन्ह असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाद सुरू आहे. दोन्ही गटाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना या नावावर दावा करण्यात आल्याने निवडणूक आयोगाकडून चिन्हासह शिवसेना हे नाव गोठवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुढील आदेश येईपर्यंत दोन्ही गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"