योगींची नवी खेळी! अखिलेश यादव यांना पुन्हा मोठा धक्का बसणार? भाजपने आखली रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 07:20 PM2022-04-04T19:20:18+5:302022-04-04T19:22:30+5:30
उत्तर प्रदेश निवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा एकदा भाजप अखिलेश यादव यांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Election 2022) भाजपने जोरदार मुसंडी मारून पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) दुसऱ्यांदा विराजमान झाले. समाजवादी पक्षासह अन्य विरोधी पक्षांनी भाजपविरोधी वातावरण केले होते. मात्र, समाजवादी पक्षाला पराभव पत्करावा लागला. आता पुन्हा एकदा भाजप अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अखिलेश यादव यांनी शिवपाल यादव यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून, अखिलेश यांचे चुलते आणि आमदार शिवपाल यादव यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याशिवाय, शिवपाल यादव यांची भाजपसोबत जवळीक वाढली असून, भाजपकडून शिवपाल यादव यांना विधानसभेचे उपाध्यक्षपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भाजपची २०२४ साठी तयारी सुरू
विधानसभा निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड दिल्यानंतर आता भाजप आगामी लोकसभा निवडणुकीतही निर्विवाद वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यूपीत यादव मतदारांची संख्या लक्षणीय आहे. यादव समाज या समाजवादी पक्षाचा पारंपरिक मतदार मानला जातो. त्यामुळे या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपकडून शिवपाल यादव यांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, गेली अनेक वर्षे शिवपाल यादव समाजवादी पक्षासाठी काम करीत आहेत. अखिलेश यादव यांच्यासोबत झालेल्या मतभेदांमुळे काही वर्षांपूर्वी ते पक्षातून बाहेर पडले होते. यानंतर शिवपाल यादवांनी आपल्या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. मात्र २०२२ च्या विधानसभा निवडणुकीआधी ते पुन्हा एकदा अखिलेश यादव यांच्यासोबत जात सपासोबत युती केली. परंतु, निवडणुकीनंतर शिवपाल यादव यांना मोठी जबाबदारी देण्यास अखिलेश यादव अनुकूल नसल्याने आता शिवपाल यादव दुसऱ्या संधीच्या शोधात असल्याचे सांगितले जात आहे. याचा फायदा करून घेण्यास भाजप उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे.