NIA raids, Gangsters on Hit List: टेरर फंडिंगविरोधात NIA 'अॅक्शन मोड'मध्ये; सात राज्यांत ७० हून अधिक छापे!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 02:33 PM2023-02-21T14:33:53+5:302023-02-21T14:35:17+5:30
पहाटे ५ वाजल्यापासून धाडसत्र सुरू, टेरर फंडिंगशी संबंधित गँगस्टर्सवर कारवाई
NIA raids, Gangsters on Hit List: राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए ही टेरर फंडिंग प्रकरणी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. एनआयएने दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि गुजरातसह सात राज्यांमध्ये एकाच वेळी ७० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. टेरर फंडिंगशी संबंधित असलेल्या गुंडांवर ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयच्या चौकशीत अनेकांची नावे समोर आली आहेत. एनआयएला तपासात काही पुरावेही मिळाले आहेत. एनआयएने छापे घातलेल्या गुंडांमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार कुलविंदर आणि पीलीभीतमधील दिलबाग सिंग या नावांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे.
पहाटे ५ वाजल्यापासून सुरू आहे छापेमारी
पहाटे पाच वाजल्यापासून एनआयएची छापेमारी सुरू आहे. गुंडांच्या या रॅकेट विरुद्ध एनआयएचा हा चौथा छापा आहे. एनआयच्या या छाप्यात कॅनडामध्ये दहशत पसरवणाऱ्या आणि मूळचा पंडाबचा असणारा लखबीर लांडा याच्या व्यतिरिक्त गँगस्टर लॉरेन्स आणि गोल्डी ब्रारच्या जवळच्या नातेवाईकांवर छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती आहे. एनआयने काही दिवसांपूर्वी लखबीर लांडाला दहशतवादी घोषित केले आहे. तेव्हापासून त्याच्या जवळच्या नातेवाईकांवर सतत नजर ठेवण्यात येत आहे.
एकूण ७०हून अधिक ठिकाणी छापे
एनआयएने पंजाबमधील तरनतारन आणि फिरोजपूरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशातील प्रतापगड आणि पिलीभीतमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. हरियाणात मोहनपूर गावात गँगस्टर सुरेंद्र उर्फ चीकू आणि नारनौलच्या सेक्टर-1 मधील त्याच्या एका नातेवाईकाच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. याशिवाय गुजरात आणि राजस्थानमध्येही अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.