नितीश कुमारांना मोठा धक्का, बिहारमध्ये महाआघाडीला तडे, जीतनराम मांझींच्या मुलाने दिला मंत्रिपदाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 01:11 PM2023-06-13T13:11:33+5:302023-06-13T13:12:34+5:30
Nitish Kumar, Mahagathbandhan: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात देशव्यापी आघाडी उभी करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. तर दुसरीकडे बिहारमध्ये त्यांच्याच नेतृत्वाखालील महाआघाडीला तडे जात असल्याचे संकेत मिळत आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात देशव्यापी आघाडी उभी करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. तर दुसरीकडे बिहारमध्ये त्यांच्याच नेतृत्वाखालील महाआघाडीला तडे जात असल्याचे संकेत मिळत आहे. बिहारमधील सत्ताधारी महाआघाडीमधील घटकपक्ष असलेल्या हिंदुस्थान अवाम मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी यांचे पुत्र संतोष सुमन मांझी यांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.
जीतनराम मांझी यांचे पुत्र संतोष सुमन मांझी हे नितीश कुमार सरकारमध्ये अल्पसंख्याक कल्याण विभागाचं मंत्रिपद सांभाळत होते. हल्लीच एका मुलाखतीमध्ये जीतनराम मांझी यांनी नितीश कुमार यांच्यावर गंभीरा आरोप केला होता. नितीश कुमार हे हिंदुस्थान अवाम मोर्चा पक्षाचं जेडीयूमध्ये विलिनीकरण करण्यासाठी दबाव आणत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. आम्हाला जेडीयूमध्ये विलीन होण्यासाठी भाग पाडलं जात आहे, असे ते म्हणाले होते.
बिहारचे माजी मुख्यमंत्री असलेल्या जीतनराम मांझी यांनी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महाआघाडीतून आपल्या पक्षाला लोकसभेच्या किमान ५ जागा देण्यात याव्यात अशी मागणी केली होती. हम हा बिहारमधील एक स्थानिक पक्ष आहे. त्याची स्थापना २०१५ मध्ये जीतनराम मांझी यांनी केली होती. बिहार विधानसभेमध्ये मांझींच्या पक्षाच्या एकूण ४ जागा आहेत.