"आता कोणताही माफिया कोणालाही धमकावू शकत नाही", अतीक-अशरफच्या हत्येनंतर योगी आदित्यनाथ यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 02:25 PM2023-04-18T14:25:28+5:302023-04-18T14:27:01+5:30
लोकभवन येथे पीएम मित्र योजनेअंतर्गत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासमोर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी योगी आदित्यनाथ बोलत होते.
गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, आता उत्तर प्रदेशात दंगली होत नाहीत. उत्तर प्रदेशात आता कायद्याचे राज्य आहे. तसेच, आता कोणतेही व्यावसायिक गुन्हेगार आणि माफिया कोणत्याही उद्योजकांना धमकावू शकत नाहीत, उत्तर प्रदेश आज तुम्हाला सर्वोत्तम कायदा आणि सुव्यवस्थेची हमी देतो, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
मंगळवारी लोकभवन येथे पीएम मित्र योजनेअंतर्गत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासमोर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी योगी आदित्यनाथ बोलत होते. ते म्हणाले, जे माफिया आधी संकट होते, तेच आता संकटात आले आहेत. उत्तर प्रदेशात आमच्या सरकारमध्ये एकदाही कर्फ्यू लागू करण्यात आलेला नाही. आता कोणत्याही जिल्ह्याच्या नावाची भीती नाही. उत्तर प्रदेश आता विकासासाठी ओळखला जातो. यापूर्वी उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली होती, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
#WATCH अब कोई पेशेवर अपराधी और माफिया किसी उद्यमियों को डरा धमका नहीं सकता है, उत्तर प्रदेश आज आपको बेहतरीन कानून व्यवस्था की गारंटी देता है: उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ pic.twitter.com/AY6vGiuME1
— ANI_HindiNews (@AHindinews) April 18, 2023
गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली. या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये रुटीन हेल्थ चेकअपसाठी नेत असताना हा प्रकार घडला. यानंतर पोलिसांनी अतीक अहमद आणि अशरफ अहमद यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांनीही अटक केली आहे. दरम्यान, अतीक अहमद आणि अशरफ अहमद यांना 2005 मधील उमेश पाल हत्याकांड प्रकरणी, प्रयागराज येथे एका न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आले होते. यापूर्वी, 13 एप्रिलला झांसी जिल्ह्यातील परीछा डॅम भागात अतीकचा मुलगा असद आणि मुहम्मद गुलाम यांचा पोलीस एनकाउंटरमध्ये मृत्यू झाला होता.
17 पोलील कर्मचाऱ्यांरी निलंबित
अतीक अहमद आणि अशरफच्या हत्येनंतर, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या 17 पोलील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. याचबरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. याशिवाय, अतिक आणि अशरफच्या हत्येनंतर, प्रयागराजमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच, परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.