जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश; जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 08:26 PM2024-09-11T20:26:22+5:302024-09-11T20:26:40+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. उधमपूर जिल्ह्यातील बसंतगढच्या वरच्या भागात सुरू असलेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगडच्या वरच्या भागात सुरू असलेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले. लष्कराने ही माहिती दिली. घनदाट जंगलात दहशतवाद्यांविरुद्धची ही पहिली यशस्वी कारवाई असून, गेल्या सहा महिन्यांत सहाहून अधिक चकमकी झाल्या आहेत. २८ एप्रिल रोजी एका गावाच्या संरक्षण रक्षकाला आपला जीव गमवावा लागला आणि १९ ऑगस्ट रोजी एका CRPF निरीक्षकाला चकमकीत आपला जीव गमवावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, खंडा टॉपवरील ऑपरेशन भागात आणखी एक दहशतवादी लपला असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांनी रात्री १२.५० च्या सुमारास सर्च पार्टीवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. “खंडारा येथे रायझिंग स्टार कॉर्प्सच्या जवानांसोबत सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले,” असे लष्कराने ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
गेल्या महिन्यात, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी कठुआ जिल्ह्यातील उंच भागात दिसलेल्या चार दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले होते. त्याच्याबद्दल विश्वासार्ह माहिती देणाऱ्याला पोलिसांनी २० लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले होते.
८ जुलै रोजी कठुआ जिल्ह्यातील माचेडी येथील दुर्गम जंगल परिसरात लष्कराच्या गस्तीवर दहशतवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर सह पाच जवान शहीद झाले.
शोधमोहीम राबवूनही पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित काश्मीर टायगर्सचे दहशतवादी अद्याप पकडले गेले नाहीत. त्यांनी पाकिस्तानातून भारतात घुसखोरी केली होती. ट्विटरवर एका पोस्टमध्ये पोलिसांनी चार दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी केली आहेत.