भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय, कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका, ७ जण मायदेशी परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 07:20 AM2024-02-12T07:20:45+5:302024-02-12T07:44:55+5:30
Qatar Release Eight Indian Nationals: हेरगिरीचा आरोप करत कतारमधील न्यायालयाने भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणामध्ये भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय झाला आहे.
हेरगिरीचा आरोप करत कतारमधील न्यायालयाने भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणामध्ये भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय झाला आहे. फाशीची शिक्षा सुनावलेल्या या आठही भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांची मुक्तता केली असून, त्यापैकी ७ जण मायदेशी परतले आहेत. याआधी या प्रकरणात भारताने कतारसोबत राजनैतिक पातळीवर चर्चा केल्यानंतर या आठ जणांना सुनावण्यात आलेली मृत्युदंडाची शिक्षा कमी करून कारावासाची शिक्षा सुनावली होती.
या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. तसेच या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्रालयाला विनंती केल्यानंतर सर्व राजनैतिक माध्यमांचा वापर करून त्यांना परत आणण्यासाठी कायदेशीर मदत केली जाईल, असं आश्वासन परराष्ट्र मंत्रालयानं दिलं होतं. दरम्यान, कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ अधिकाऱ्यांची सुटका झाली असून, त्यापैकी ७ जण मायदेशी परतल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
#WATCH | Delhi: Qatar released the eight Indian ex-Navy veterans who were in its custody; seven of them have returned to India. pic.twitter.com/yuYVx5N8zR
— ANI (@ANI) February 12, 2024
दरम्यान, भारताच्या आठ माजी नौसैनिकांची मुक्तता करण्याच्या कतारच्या निर्णयाचं भारत सरकारने स्वागत केलं आहे. भारत सरकार दाहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणाऱ्या आठ भारतीय नागरिकांच्या मुक्ततेचं स्वागत करत आहे. ज्या अधिकाऱ्यांना कतारमध्ये अटक करण्यात आली होती. त्यापैकी ७ जण मायदेशी परतले आहेत. आम्ही या भारतीय नागरिकांची मुक्तता करण्याच्या आणि मायदेशी परत पाठवण्याच्या निर्णयाबाबत कतारच्या अमिर यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतो, असं भारत सरकारने म्हटले आहे.
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात कतारमधील तुरुंगात बंद असलेल्या भारताच्या आठ माजी नौसैनिकांना न्यायालयाने हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या शिक्षेला आव्हान देण्यात आले असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती. या माजी नौदल अधिकाऱ्यांना २०२२ च्या ऑगस्ट महिन्यात अटक करण्यात आली होती. तसेच ते ऑक्टोबर २०२२ पासून तुरुंगात बंद होते.