बॉलीवूडवर मोठे संकट

By admin | Published: February 8, 2016 02:37 AM2016-02-08T02:37:53+5:302016-02-08T04:56:29+5:30

भारताचे सिनेजगत धर्मनिरपेक्षतेसाठी केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे; पण सध्याची स्थिती पाहता सिनेजगत गंभीर संकटात सापडल्याचे दिसते.

Bigger crisis on Bollywood | बॉलीवूडवर मोठे संकट

बॉलीवूडवर मोठे संकट

Next

लोकमत स्पेशल, अनुज अलंकार
भारताचे सिनेजगत धर्मनिरपेक्षतेसाठी केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे; पण सध्याची स्थिती पाहता सिनेजगत गंभीर संकटात सापडल्याचे दिसते. हे संकट केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या नेत्यांशी थेट जोडले गेले आहे, हे स्पष्ट सांगावेसे वाटते. भाजपाचे नेते दररोज बॉलीवूडच्या सिताऱ्यांना ‘लक्ष्य’ करीत असून धर्माचे राजकारण ते सिनेजगताशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.
गेल्या वर्षी दिल्लीत सत्ता हाती घेतल्यापासून भाजपाच्या सरकारने सिनेजगताशी आपला खेळ सुरू केला आहे. या खेळाची अपेक्षाच नव्हती. मात्र या खेळाचे परिणाम आता समोर येत आहेत. सेन्सॉर बोर्ड ते पुण्यातील इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन सरकारने ज्या
पद्धतीने हाताळले ते पाहता या खेळामागे सरकारच असल्याचे स्पष्ट झाले.
यापूर्वीच्या सरकारांनीही या पदांवर आपल्या पसंतीचे लोक बसविले होते. पण असा तमाशा कधीही झाला नव्हता. या तमाशाशिवाय भाजपाचे नेते बॉलीवूडच्या सिताऱ्यांना ज्या पद्धतीने ‘लक्ष्य’ करीत आहेत, ती पद्धत अधिक धोकादायक आहे. सहिष्णुतेच्या मुद्द्यावरून शाहरूख खान आणि आमीर खान यांचा करण्यात आलेला अपमान त्यांच्यापेक्षा भारताच्या सिनेसृष्टीचा आणि देशाच्या सिनेजगताचा झाला.
सहिष्णुतेच्या मुद्द्यावर मत व्यक्त केल्याबद्दल देशातील कोणत्याही न्यायालयाने शाहरूख किंवा आमीर खान यांना दोषी ठरविलेले नाही. उलट या दोघांना अपमानित करणाऱ्या नेत्यांना न्यायालयाने लाथाडले आहे. असे असूनही हे लोक अजून सुधारत नाहीत.
भूज येथे ‘रईस’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना शाहरूख खानला विरोध करण्यात आला. हा विरोध पाहता तो एखाद्या मुद्द्याच्या आधारे नव्हे, तर शाहरूख मुस्लीम आहे म्हणून करण्यात आला. त्यातही शाहरूखचे नाव मोदी समर्थक सिताऱ्यांच्या यादीत नाही म्हणून करण्यात आला. मोदी समर्थक नसलेल्या नटाला त्याच्या धर्माच्या आधारे किंवा अन्य कोणत्याही मुद्द्यावरून त्रास दिला जाऊ शकतो हे स्पष्ट आहे. शाहरूख खान आणि आमीर खान यांची मोदी समर्थक करीत असलेली अडवणूक हे याचे जिवंत उदाहरण आहे.
हे सर्व लोक फार मोठा घाणेरडा आणि वाईट खेळ खेळत आहेत. विशेष म्हणजे देशाच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली हे सर्व जण लाजिरवाणा खेळ खेळत आहेत. त्यातून देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळत असून त्यातून त्यांच्या हलक्या मानसिकतेचे दर्शन घडते. त्यातही देशाचे सर्वोच्च नेते आणि त्यांचा पक्ष याचा पाठपुरावा करीत आहेत ही दु:खाची बाब आहे. बॉलीवूडने यापूर्वी कधीही अशा संकटाचा सामना केला नव्हता. दिल्लीत सरकारे येतात-जातात, सरकारे बदलतात. बॉलीवूडचे चरित्र बदलण्याचे चालू असलेले प्रयत्न सर्वात धोकादायक आणि आव्हानात्मक आहेत.

Web Title: Bigger crisis on Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.