ड्रायव्हरच्या दक्षतेमुळे टळला मोठा रेल्वे अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 04:36 AM2018-07-09T04:36:41+5:302018-07-09T04:36:57+5:30
मेरठ येथील पुथा गावानजीक रेल्वे रुळांवर १७ फूट लांबीची लोखंडी कांब ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर नवी दिल्लीला जाणाऱ्या नंदादेवी एक्स्प्रेसच्या मोटरमनने प्रसंगावधान राखून आपत्कालीन ब्रेक दाबले व गाडी थांबविली.
मेरठ - येथील पुथा गावानजीक रेल्वे रुळांवर १७ फूट लांबीची लोखंडी कांब ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर नवी दिल्लीला जाणाऱ्या नंदादेवी एक्स्प्रेसच्या मोटरमनने प्रसंगावधान राखून आपत्कालीन ब्रेक दाबले व गाडी थांबविली. अशा रितीने भीषण अपघात टाळून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली. हा प्रकार मोटरमनने तत्काळ नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी हजर झाले. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश पांडे यांनी सांगितले की, अमली पदार्थांचे व्यसन करणारे लोक अनेकदा स्टील फिश प्लेट, तसेच रेल्वेच्या अन्य सामुग्रीची चोरी करतात. अशाच एखाद्या नशाबाजापैकी कोणीतरी ही लोखंडी कांब रुळावर आणून ठेवली असावी, असे प्रथमदर्शनी वाटते.