महाआघाडीत बिघाडी? काँग्रेसची नितीश कुमारांवर टीका
By admin | Published: June 26, 2017 06:08 PM2017-06-26T18:08:28+5:302017-06-26T18:08:28+5:30
कोविंद यांना पाठिंबा देणाऱ्या नितीश कुमार यांच्यावर आता काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - भाजपाने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दिलेल्या उमेदवारीमुळे आता विरोधी पक्षांमध्ये उघडपणे मतभेद होऊ लागले आहेत. कोविंद यांना पाठिंबा देणाऱ्या नितीश कुमार यांच्यावर आता काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी बिहारमध्ये भाजपाला मात देणाऱ्या महाआघाडीमध्ये आता सारे काही आलबेल नसल्याचेच चित्र आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी कोविंद यांना पाठिंबा देण्यावरून नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले आहे. "जी माणसे एकाच विचारसरणीवर विश्वास ठेवतात, ती केवळ एकच निर्णय घेऊ शकतात, तर ज्यांचा अनेक विचारधारांवर विश्वास असतो ते अनेक प्रकारचे निर्णय घेतात," असा टोला आझाद यांनी लगावला आहे.
मीरा कुमार यांना पराभूत होण्यासाठी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार बनवण्यात आले आहे, असे नितीश कुमार म्हणाले होते. त्यालाही आझाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "नितीश हे असे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी बिहारच्या मुलीला पराभूत करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही नाही."असे आझाद म्हणाले.
गेल्या काही काळापासून बिहारमधील महाआघाडीत खटके उडत आहेत. त्यातच नितीश कुमार यांनी रालोआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केल्याने लालू प्रसाद यादवांचा राजद आणि नितीश कुमारांचा संजद यांच्यात शाब्दिक चकमकी घडू लागल्या आहेत. दोन्ही पक्षांची नेतेमंडळी एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत.