सर्वांत मोठा स्पेक्ट्रम लिलाव २९ सप्टेंबरपासून
By admin | Published: August 10, 2016 03:48 AM2016-08-10T03:48:54+5:302016-08-10T03:48:54+5:30
भारत सरकार टेलिकॉम स्पेक्ट्रमचा आजवरचा सर्वात मोठा लिलाव येत्या २९ सप्टेंबरपासून सुरू करणार असून, त्यात सात विविध बॅण्डचा स्पेक्ट्रम विकला जाणार आहे.
नवी दिल्ली : भारत सरकार टेलिकॉम स्पेक्ट्रमचा आजवरचा सर्वात मोठा लिलाव येत्या २९ सप्टेंबरपासून सुरू करणार असून, त्यात सात विविध बॅण्डचा स्पेक्ट्रम विकला जाणार आहे. टेलिकॉम कंपन्यांना हा जास्तीचा स्पेक्ट्रम उपलब्ध झाल्यावर सध्या ग्राहकांना सतावत असलेल्या ‘कॉल ड्रॉप’ आणि ब्रॉडबॅण्डचा धीमा वेग या अडचणी दूर होतील, अशी अपेक्षा आहे.
या स्पेक्ट्रम विक्रीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांकडून अर्ज मागविणारी नोटीस टेलिकॉम खात्याने जारी केली. या लिलावात एकूण २,३५५ मेगाहर्स्ट्स एवढा स्पेक्ट्रम विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल. हा सर्व स्पेक्ट्रम त्यासाठी ठरविलेल्या राखीव किंमतीला विकला गेला तर त्यातून सरकारला ५.६ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळेल, असे टेलिकॉम सचिव जे. एस. दीपक यांनी सांगितले.
७०० मेगाहर्स्ट््स, ८०० मेगाहर्स्ट््स, ९०० मेगाहर्स्ट््स, १८०० मेगाहर्स्ट््स, २१०० मेगाहर्स्ट््स, २३०० मेगाहर्स्ट््स आणि २५०० मेगाहर्स्ट््स अशा एकूण सात बॅण्डचा स्पेक्ट्रम यावेळी विक्रीसाठी उपलब्ध असेल. याआधी गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या लिलावात सरकारने १.१ लाख कोटी रुपयांचा स्पेक्ट्रम विकला होता.
अधिक चांगल्या सेवा देऊ शकणारा ७०० मेगाहर्स्ट्स बॅण्डचा स्पेक्ट्रम यावेळी प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यासाठी देशपातळीवर प्रति मेगाहर्स्ट्ससाठी ११,५०० कोटी रुपये अशी राखीव किंमत ठेवण्यात आली आहे. ही राखीव किंमत खूपच जास्त आहे, अशी तक्रार भारती एअरटेल व व्होडाफोन यासारख्या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी केली आहे. परंतु या किंमतीलाही या स्पेक्ट्रमला चांगली मागणी असेल, असा विश्वास व्यक्त करून दीपक म्हणाले की, हा तावून सुलाखून शुद्ध केलेल्या सोन्यासारखा उच्च दर्जाचा स्पेक्ट्रम असल्याने तो महाग आहे.
हा लिलाव अधिक आकर्षक व्हावा, यासाठी सरकारने गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी अनेक नवे बदल केले आहेत, असे सांगून दीपक म्हणाले की, गेल्या वेळी ‘स्पेक्ट्रम युजेस चार्जेस’ ५ टक्के होते. यावेळी ते कमी करून ३ टक्के करण्यात आले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)