पोखरणमध्ये रंगणार सर्वांत मोठा युद्ध सराव!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 06:19 AM2019-11-15T06:19:22+5:302019-11-15T06:19:29+5:30
शत्रूच्या हद्दीत वेगाने शिरून त्याला नामोहरम करणारा सर्वांत मोठा 'सिंधू सुदर्शन' हा युद्धसराव पोखरणच्या वाळवंटातील फिल्ड फायरिंग रेंजमध्ये शुक्रवारपासून होणार आहे.
निनाद देशमुख
पोखरण : शत्रूच्या हद्दीत वेगाने शिरून त्याला नामोहरम करणारा सर्वांत मोठा 'सिंधू सुदर्शन' हा युद्धसराव पोखरणच्या वाळवंटातील फिल्ड फायरिंग रेंजमध्ये शुक्रवारपासून होणार आहे. या युद्धसरावात हवाई दल व लष्कराचे ४० हजार जवान सहभागी होणार आहेत.
पश्चिम सीमेकडील राष्ट्राच्या सीमेत खोलवर शिरत हल्ला करून त्यांची ठिकाणे कशी उद्ध्वस्त करायची हा युद्धसरावाचा उद्देश आहे. वाळवंटातील परिस्थितीत कसे लढायचे, आपसात ताळमेळ कसा राखायचा, व्यूहरचना कशी आखायची, लष्कराच्या सर्व विभागांचा सक्रिय सहभाग कसा ठेवायचा याचाही अभ्यास केला जाणार आहे. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी हे तयारीचा आढावा घेणार आहेत. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारीत देशाचा ४० टक्के भूभाग येतो. सुदर्शन चक्र स्ट्राइक कोरचे मुख्यालय भोपाळ येथे आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कराने केलेली कारवाई, बालाकोटमधील दहशतवदी तळावर हवाई दलाने केलेले हल्ले आणि काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याने भारत व पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव या पार्श्वभूमीवर या सरावाला विशेष महत्त्व आहे.
>दोन महिने चालणार सराव
दोन महिने चालणाऱ्या या युद्धसरावाचे आयोजन लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या सुदर्शन चक्र स्ट्राइक कोअरने केले आहे. गेली तीन वर्षे असा युद्ध सराव केला जातो. यंदा प्रथमच लष्करासोबत हवाई दल यात सहभागी होणार आहे. तब्बल ४० हजार पायदळ सैन्याबरोबरच टँक डिव्हिजन, आर्टिलरी डिव्हिजन, आर्मी एव्हिएशन व एअर डिफेन्स डिव्हिजन यात सहभागी होतील.