ऐकावं ते नवलच! ३४ वर्षांपूर्वी २० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिसाला अखेर अटक होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 04:15 PM2024-09-05T16:15:49+5:302024-09-05T16:15:58+5:30
तब्बल ३४ वर्षांनी या प्रकरणी निर्णय आल्याने याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियाच्या या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. नेहमी अनोख्या गोष्टी नेटकऱ्यांचे मनोरंजन करत असतात. बिहारमधील सहरसा येथून एक अशीच हास्यास्पद तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सहरसा रेल्वे स्थानकावर भाजीपाल्याची टोपली घेऊन जाणाऱ्या सीतादेवी नावाच्या महिलेकडून २० रुपयांची लाच घेणाऱ्या हवालदाराला अटक करण्यात येणार आहे. ३४ वर्षे जुन्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी हवालदारला अटक करून हजर करण्याचे आदेश दिले आहेत. पण, तब्बल ३४ वर्षांनी या प्रकरणी निर्णय आल्याने याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या लाच प्रकरणात न्यायाधीश सुदेश श्रीवास्तव यांनी डीजीपीला फरार कॉन्स्टेबलला अटक करून त्याला हजर करण्यास सांगितले आहे. विशेष न्यायाधीशांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, पाटणाच्या उच्च न्यायालयाने या प्रकरणाची प्रलंबित प्रकरणे गांभीर्याने घेत अखेर निर्णय दिला. संबंधित पोलीस हवालदार १९९९ पासून फरार होता. त्याच्याविरोधातील अटक वॉरंट आणि त्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश काढण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
३४ वर्षांनी अखेर निर्णय आला
खरे तर आरोपी हवालदाराने हुशारीने त्याचा पत्ता चुकीचा लिहून घेतला आणि विभागाच्या अधिकाऱ्यांना फसवले होते, ज्यांनी त्याला लाच घेताना पकडले होते. जुन्या प्रलंबित खटल्यांवरील सुनावणीदरम्यान पाटणा उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतल्यानंतर हवालदाराचा खरा चेहरा समोर आला. २१ डिसेंबर १९९९ रोजी न्यायालयाने त्याचे बाँड रद्द केले आणि अनेक तारखांना न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल हवालदाराला अटक वॉरंट जारी केले.