शेतकरी आंदोलनामागे मूठभर दलाल; बिहारच्या कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त विधान
By मोरेश्वर येरम | Published: December 20, 2020 05:24 PM2020-12-20T17:24:42+5:302020-12-20T17:27:26+5:30
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज २५ वा दिवस
पाटणा
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बिहारचे कृषी मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. दिल्लीतील आंदोलनाला अमरेंद्र सिंह यांनी दलालांचं आंदोलन असं संबोधलं आहे. बिहारच्या सोनपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.
"दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवर जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांचं नसून दलालांचं आंदोलन आहे", असं अमरेंद्र सिंह म्हणाले. गेल्या तीन आठवड्यांहून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर शेतकरी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत.
"शेतकरी फक्त दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवरच आहेत का? या देशात ५.५ लाख गावं आहेत. कोणत्या गावात शेतकरी आंदोलन सुरू आहे? बिहारचे शेतकरी आंदोलन करत आहेत का? देशाच्या ५.५ लाख गावांमधील शेतकऱ्यांचा या आंदोलनाशी काही संबंध नाही. त्यांना कृषी कायदे हवेत. दिल्लीत फक्त मुठभर दलाल शेतकरी असल्याचं सांगून आंदोलन करत आहेत आणि माध्यमं त्याला मोठं करत आहेत", असं अमरेंद्र सिंह म्हणाले. खरंच जर शेतकऱ्यांचं आंदोलन असतं मग संपूर्ण देशात यास विरोध झाला नसता का?, असा सवालही अमरेंद्र यांनी यावेळी उपस्थित केला.
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज २५ वा दिवस आहे. कृषी कायदे पूर्णपणे रद्द केले जाण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. दरम्यान, एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे संयोजक हनुमान बेनीवाल यांनीही आता शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ २६ डिसेंबरला २ लाख शेतकऱ्यांसह राजस्थान ते दिल्ली मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे.