Bihar Assembly Election 2020 : तिकीट नाकारल्यानंतर बिहारमधील चाहत्यांना गुप्तेश्वर पांडेंचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 04:01 PM2020-10-08T16:01:14+5:302020-10-08T16:01:30+5:30
पांडे यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केल्यानंतर बक्सर जिल्ह्यातील कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील. अशी शक्यता वर्तवली जात होती.
मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून वादास सुरुवात झाल्यापासून बिहार पोलिसांचे तत्कालीन डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचे नाव बरेच चर्चेत होते. दरम्यान, बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येताच गुप्तेश्वर पांडे यांनी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देत थेट राजकारणात उडी घेतली होती. मात्र, पांडे यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळालं नाही. नोकरीही गेली अन् तिकीटही मिळाले नाही. त्यामुळे, आता गुप्तेश्वर पांडे काय करणार, हे त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन सांगितलंय.
पांडे यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केल्यानंतर बक्सर जिल्ह्यातील कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील. अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र जेडीयूने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज जाहीर केलेल्या ११५ उमेदवारांच्या यादीत गुप्तेश्वर पांडे यांचं नावच नसल्याने आता पांडे यांचं काय होणार याची चर्चा रंगली आहे. तर, दुसरीकडे निराश झालेल्या चाहत्यांना गुप्तेश्वर पांडे यांनी आपल्या फेसबुकवरुन संयम बाळगण्याचे आवाहन केलंय.
चाहत्यांच्या अपेक्षेनुसार मला विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळणार होते. मात्र, तिकीट न मिळाल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे. त्यामुळे, कित्येक चाहते आणि मित्र-परिवार फोन करुन नाराजी व्यक्त करत आहेत. या सर्वांच्या फोनमुळे मी त्रस्त झालो असून कृपया मला फोन करु नका, अशी विनंती पांडे यांनी चाहत्यांना केलीय. तसेच, संयम बाळगा, कुणीही निराश होऊ नये. माझं आयुष्यचं संघर्षाने भरलेलं असून बिहारच्या जनतेला माझं जीवन समर्पित आहे. मी जीवनभर बिहारच्या जनतेचीच सेवा करणार आहे. जन्मभूमी बक्सरच्या मातीला आणि तेथील सर्वच जाती-धर्माच्या बंधु-भगिनींना, युवकांना आणि मातांना माझा विनम्रतापूर्वक नमस्कार... तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच राहु द्या... अशी फेसबुक पोस्ट पांडे यांनी केली आहे. आपल्या चाहत्यांना निराश न होण्याचं व संयम बाळगण्याचं आवाहन पांडेंनी केलंय.
गृहमंत्री अनिल देशमुख यांची खोचक टीका
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुप्तेश्वर पांडेंना तिकीट न दिल्याने भाजपाला सणसणीत टोला लगावला आहे. "गुप्तेश्वर पांडे यांना भाजपाने उमेदवारी द्यावी की नाही हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. भाजपाचे नेते पांडेंचा प्रचार करणार का? असा प्रश्न आम्ही विचारला होता. त्याचं उत्तर भाजपाकडे नसावं. त्याच भीतीतून त्यांनी पांडेंना तिकीट नाकारलं असावं" असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
गुप्तेश्वर पांडे यांच्यावर अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीही निशाणा साधला होता. "बिहारचे माजी डीडीपी गुप्तेश्वर पांडे बिहारचे एक वरिष्ठ अधिकारी होते. गेल्या दीड- दोन महिन्यापासून आपण त्यांना पाहत होतो. ते असे बोलायचे की त्यांच्या बोलण्यातून ते भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत, असे वाटत होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असे बोलणे उचित नव्हते. याचबरोबर, गुप्तेश्वर पांडे ज्या प्रकारे बोलायचे, ज्या प्रकारची त्यांची वक्तव्यं असायची, त्यावरून तरी ते भाजपा नेते आहेत, असे जाणवत होते. आता राजीनामा दिल्यानंतर ते भाजपाच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या विधानांचा अंदाज येतो" असं अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं.
वाल्मिकीनगरमधून तिकीट मिळण्याची शक्यता
गुप्तेश्वर पांडे यांना वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे. ही जागा जेडीयू खासदार वैद्यनाथ प्रसाद महतो यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. या ठिकाणी १३ ऑक्टोबरपासून नामांकन प्रक्रिया सुरू होणार असून, ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघावर एनडीएचा कब्जा आहे. मात्र या जागेवर वैद्यनाथ प्रसाद महतोंच्या मुलांची पहिली दावेदारी आहे. महतोंचे दोन मुलगे व्यावसायिक आहेत. तर सुनील कुमर हा तिसरा मुलगा राजकारणात सक्रिय आहे.