"आम्ही असताना भाजपा बिहारमध्ये सरकार कसं बनवणार?’’, लालूप्रसाद यादव यांनी दिलं थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:52 IST2025-02-13T14:52:04+5:302025-02-13T14:52:35+5:30
Bihar Assembly Election 2025: महाराष्ट्र आणि दिल्लीतील निवडणुका जिंकल्यानंतर बिहार जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी करत असलेल्या भाजपाला राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आव्हान दिलं आहे. दिल्लीच्या निकालांचा बिहारमधील विधानसभा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही, असा दावा लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.

"आम्ही असताना भाजपा बिहारमध्ये सरकार कसं बनवणार?’’, लालूप्रसाद यादव यांनी दिलं थेट आव्हान
देशातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. त्यामुळे दिल्ली विधानसभेची निवडणूक आटोपल्यानंतर बिहारमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीतील निवडणुका जिंकल्यानंतर बिहार जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी करत असलेल्या भाजपाला राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आव्हान दिलं आहे. दिल्लीच्या निकालांचा बिहारमधील विधानसभा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही, असा दावा लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.
लालूप्रसाद यादव म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीवर दिल्लीतील निवडणुकीत लागलेल्या निकालाचा काही परिणाम होणार नाही. आम्ही लोक असताना भाजपा बिहारमध्ये सरकार कसं स्थापन करणार? जनतेनेही आता भाजपाला ओळखलं आहे.
लालू प्रसाद यादव यांच्या या विधानावर भाजपानेही पलटवार केला आहे. भादपाचे बिहारमधील प्रदेशाध्यक्ष दिलीप जसस्वाल म्हणाले की, बिहारमधील लालूप्रसाद यादव यांचं राजकारण संपलं आहे. लालूप्रसाद यादव हे आपल्या कुटुंबापलिकडे विचार करत नाही हे बिहारमधील जनतेलाही कळून चुकलं आहे. लालूप्रसाद यादव आपल्या कुटुंबामध्येच गुरफटले आहेत.
तर बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा म्हणाले की, बिहारला आता लालूप्रसाद यादव यांची आवश्यकता नाही आहे. लालूंनी बिहारी शब्दाला एका शिवीचं रूप दिलं होतं. लालू असो वा नसो काही फरक पडत नाही.