दिल्लीत 'त्रिदेव', आता बिहारमध्ये 'मिशन त्रिशूल'; RSS चा अजेंडा ठरला, भाजपाचा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:03 IST2025-02-19T14:02:23+5:302025-02-19T14:03:29+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीला अजून ८ महिने कालावधी आहे. मात्र आरएसएसने आतापासून या राज्यात निवडणूक तयारी सुरू केली आहे

दिल्लीत 'त्रिदेव', आता बिहारमध्ये 'मिशन त्रिशूल'; RSS चा अजेंडा ठरला, भाजपाचा फायदा
नवी दिल्ली - हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर आरएसएस बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मिशन त्रिशूल नावानं एक खास प्लॅन बनवला आहे. या प्लॅननुसार, ३ प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. नाराज मतदारांची ओळख, प्रभावी मुद्द्यांचा आढावा आणि भाजपासाठी फायदेशीर आणि नुकसानदायक ठरणाऱ्या मुद्द्यांचे विश्लेषण केले जाईल. ही रणनीती हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निवडणुकीत प्रभावी ठरल्यानंतर बिहारमध्येही वापरली जाणार आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीला अजून ८ महिने कालावधी आहे. मात्र आरएसएसने आतापासून या राज्यात निवडणूक तयारी सुरू केली आहे. बिहारमध्ये वापरण्यात येणाऱ्या रणनीतीला 'मिशन त्रिशूल' नाव देण्यात आलं आहे. त्यामागचं कारण म्हणजे या मिशन अंतर्गत ३ प्रमुख टार्गेट ठेवलं आहे. सर्व्हेतून नाराज मतदार आणि प्रमुख मुद्दे याचा आढावा घेणे, त्यानंतर कोणता मुद्दा सर्वाधिक परिणामकारक ठरेल हे ठरवणे, मग भाजपासाठी काय फायद्याचे आणि काय तोट्याचे आहे असे मुद्दे तपासून घेणे अशी ही रणनीती आहे.
मार्चमध्ये द्यावा लागणार ग्राऊंड रिपोर्ट
माहितीनुसार, बिहारमध्ये भाजपाची सत्ता आणण्यासाठी RSS कुठेही कमी पडणार नाही. मिशन त्रिशूल हे त्यादिशेने टाकलेले एक पाऊल आहे. आरएसएस स्वयंसेवकांना खास टास्क देण्यात आलं आहे. त्यांनी आपापल्या परिसरात RSS शाखेचा विस्तार करणे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांना अभियानाशी जोडण्यास सांगितले आहे. त्याशिवाय लोकांशी संपर्क साधून त्यांचे विचार जाणून घेणे, मैत्री वाढवण्याच्या सूचना आहेत. त्यातून RSS ला प्रत्यक्षात जमिनीशी जोडलेल्या लोकांचे विचार आणि त्यांचे प्रश्न जाणून घेण्यास मदत होणार आहे. स्वयंसेवकांना हे काम मार्चपर्यंत पूर्ण करून त्यांचा रिपोर्ट RSS च्या विभागीय बैठकीत द्यावा लागणार आहे.
दरम्यान, बिहार निवडणुकीपूर्वी आरएसएसकडून एक स्वतंत्र सर्व्हे केला जात आहे. हा अत्यंत गोपनीय असून त्यातून ३ गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. कोणत्या नेत्याविरोधात नाराजी आहे, कोणता मुद्दा अधिक प्रभावी ठरेल, कोणता मुद्दा भाजपाला फायदा देईल. सर्व्हेचा रिपोर्ट निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावेल. निवडणूक वर्षात RSS बिहारमधील शाखांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारमध्ये उत्तर बिहार, दक्षिण बिहार असे २ प्रांत आहेत, मुजफ्फरपूर इथं उत्तर बिहारचं तर पटना इथं दक्षिण बिहारचं मुख्यालय आहे. बिहारमध्ये सध्या १००० ठिकाणी आरएसएसची शाखा आहे.
दिल्लीत राबवलं होतं 'त्रिदेव'
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आरएसएसने बूथ पातळीवर त्रिदेव तैनात केले होते. त्रिदेवमध्ये एक पुरूष, एक महिला आणि एक युवा यांचा समावेश होता. हे त्रिदेव आपापल्या भागात लोकांशी संपर्कात होते आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील होते. प्रत्येक त्रिदेव अंतर्गत कमीत कमी १० लोक काम करत होते. त्याप्रमाणे आरएसएसने मजबूत नेटवर्क तयार केले होते ज्यातून निवडणुकीत भाजपाला खूप मदत मिळाली. आता आरएसएसची ही रणनीती बिहारमध्येही वापरण्यात येणार आहे.