नितीश कुमार भाजपसोबत निवडणूक लढवतील, पण..; प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 19:56 IST2025-03-05T19:55:41+5:302025-03-05T19:56:10+5:30
Bihar Assembly Election : या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.

नितीश कुमार भाजपसोबत निवडणूक लढवतील, पण..; प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
Bihar Assembly Election : या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यंदाची निवडणूक मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे भाजपने यापूर्वीच जाहीर केले आहे. अशातच, निवडणूक रणनीतीकार आणि जन सूरज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बुधवारी मोठा दावा केला. ते म्हणाले की, नितीशकुमार बिहारमध्ये भाजपसोबत निवडणूक लढवतील, पण नंतर पक्ष बदलू शकतात. मात्र, नितीश कुमारांची लोकप्रियता आता संपली आहे, त्यामुळे ते सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
पश्चिम चंपारण येथील पत्रकार परिषदेत किशोर म्हणाले की, नोव्हेंबरमध्ये निवडणुका संपल्यानंतर नितीश कुमार वगळता कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. मी लिहून देतो. मी चुकीचा सिद्ध झालो, तर राजकारण सोडेन. नितीश कुमारांच्या भाजपशी असलेल्या संबंधांबाबत प्रशांत किशोर म्हणाले की, ते भाजपसोबत युती करून निवडणूक लढवतील आणि नंतर इतर पक्षाकडे जातील. नितीश कुमारांची लोकप्रियता कमालीची घसरल्याने भाजप यावेळी नितीश यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
नितीश पुन्हा मुख्यमंत्री होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांनी निवडणुकीनंतर नितीश कुमार पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहण्याची घोषणा केली, तर भाजपला जागा जिंकणे कठीण होईल. जेडीयू यंदाच्या निवडणुकीत अत्यंत खराब कामगिरी करणार आहे. नितीश कुमारांना समजेल की, भाजप आपल्याला पाठिंबा देणार नाही, तेव्हा ते पुन्हा बाजू बदलू शकतात. परंतु जेडीयूच्या जागा इतक्या कमी असतील की, त्यांना मुख्यमंत्रिपद मिळणार नाही.
नितीश कुमार शारीरिकदृष्ट्या थकले
प्रशांत किशोर पुढे म्हणतात, नितीश कुमार शारीरिकदृष्ट्या थकलेले आणि मानसिकदृष्ट्या निवृत्त झाले आहेत. मुख्यमंत्री आपल्या कॅबिनेट मंत्र्यांची नावेही कागदपत्रे पाहिल्याशिवाय सांगू शकत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. तसेच, अनेक दशकांपासून नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यातील सत्ता संघर्षात अडकलेल्या या “राजकीय दलदलीतून” बिहारला बाहेर काढण्यासाठी त्यांचा जन सूरज पक्ष तयार आहे, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला.