Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये अपेक्षित निकाल लागला नाही, शरद पवारांनी सांगितलं कारण
By बाळकृष्ण परब | Published: November 10, 2020 06:20 PM2020-11-10T18:20:57+5:302020-11-10T18:23:58+5:30
Bihar Assembly Election Result News : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे.
मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. दरम्यान, या अटीतटीच्या लढतीमध्ये एनडीएने आघाडी घेतली आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, बिहारच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणावं तेवढं लक्ष दिलं नाही. नवीन नेतृत्व असल्याने त्याला वाव मिळावा म्हणून आम्ही बिहारमध्या जागांबाबत आग्रह धरला नाही, असे पवार यांनी सांगितले.
ते म्हणाले की, बिहारमध्ये आम्हाला अपेक्षित असा निकाल आला नाही. त्याची काही कारणं आहेत. एकीकडे तेजस्वी यादव यांनी एकहाती मोर्चा सांभाळला होता. तर दुसरीकडे एनडीएकडे सर्व व्यवस्था होती. मोदींनी आक्रमक प्रचार केला. एकंदरीत तेजस्वी यादव यांनी अनुभवाच्या मनाने चांगली लढत दिली. आता त्यांना यश मिळालं नसलं तरी आणि परिवर्तन झालं नसंल तरी हळुहळू बदल होईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे बहुतांश कल आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये आतापर्यंत एनडीए १२३ जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी ११२ जागांवर आघा़डीवर आहे. तर इतर उमेदवार ८ जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत स्वबळावर उतरलेले चिराग पासवान यांच्या हाती मात्र निराशा लागली असून, त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार आघाडीवर नाही आहे.