Bihar Assembly Election Results : बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, NDA बहुमताच्या पुढे
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 10, 2020 11:51 AM2020-11-10T11:51:51+5:302020-11-10T11:57:13+5:30
कोरोना काळातील ही देशातील पहिलीच निवडणूक आहे. हिंदी बेल्टमधील निवडणुकीच्या दृष्टीने, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमधील निवडणूक तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची निवडणूक मानली जाते.
पाटणा - बिहार निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. राज्याची सत्ता कुणाच्या हाती द्यायची हे जनतेने मतदान करून मतदान यंत्रांमध्ये बंद केले आहे. आता थोड्याच वेळात बिहारचे चित्र अगदी स्पष्ट होईल. मात्र, आतापर्यंत आलेल्या निकालांत एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे. तर भाजपा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे.
कोरोना काळातील ही देशातील पहिलीच निवडणूक आहे. हिंदी बेल्टमधील निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमधील निवडणूक तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची निवडणूक मानली जाते. यामुळेच हिम्मत करून लोक घरातून बाहेर पडले, सभा झाल्या आणि मतदानही झाले. मात्र, आता वेळ आहे मतमोजणीची आणि बिहारच्या मनात नेमके कोण? हे पाहण्याची.
यावेळी बिहारमध्ये महागठबंधनविरुद्ध एनडीए, अशी काट्याची टक्कर बघायला मिळाली. मात्र, आजचे निकाल म्हणजे गत 15 वर्षांच्या नितिश सरकारसंदर्भातील जनतेचा निर्णय असेल. महत्वाचे म्हणजे, बिहारमध्ये एका मावळत्या पिढीला नव्या आणि उगवत्या पिढीने थेट टक्कर दिली आहे. यात जनतेने नव्या आणि जुन्यात आपले पुढील भविष्य निवडले आहे.
या निवडणुकीत 31 वर्षीय तेजस्वी यादव यांनी नीतीश कुमारांबरोबर थेट टक्कर घेतली आहे. एनडीएला 150 हून अधिक जागा मिळतील, असे जेडीयूने म्हटले आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा असून यावेळी एकूण तीन टप्प्यांत मतदान पार पडले आहे.
"कुणीही पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढणार नाही" -
तेजस्वी यादव यांनी त्यांच्या घराबाहेर जमलेल्या नेत्यांना, मतमोजणी सुरू होण्यापूर्वी बोलावले आणि निवडणुकीचा निकाल काहीही आला, तरी कुणीही पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ते म्हणाले, अनेक नेते कॅमेऱ्यासमोर पंतप्रधान मोदींविरोध बोलत आहेत, हे योग्य नाही. आता, अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवर कारवाईही केली जाऊ शकते, असा इशाराही तेज्वी यांनी यावेळी दिला आहे.
बिहारमध्ये प्रचंड बहुमताने बनणार एनडीए सरकार -
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी सोमवारी मतमोजणीच्या एक दिवस आधी दावा केला की, बिहारमध्ये एनडीए सरकार प्रचंड बहुमताने बनणार आहे आणि नितीशकुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारतील. त्यांनी एक निवेदन जारी केले, की बिहारमधील तीन टप्प्यांच्या निवडणुका संपल्यानंतर एक गोष्ट निश्चित आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि मोठ्या संख्येने मतदारांनी एनडीएच्या बाजूने मतदान केले आहे.
Bihar Assembly Election Result : तेजस्वी पर्व! बिहारमध्ये "मंगलराज" सुरू होईल - संजय राऊत
मध्य प्रदेश पोटनिवडणुकीच्या निकालातही भाजपाची विजयी घौडदोड -
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासोबतच मध्य प्रदेशातील २८ जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल समोर येत आहेत, या पोटनिवडणुकीत भाजपाला सत्ता टिकवण्यासाठी ८ जागांची गरज आहे. या निकालाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा १३ जागांवर तर काँग्रेस ७ आणि बसपा १ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
भाजपाने नितीश कुमारांप्रमाणे पाठिंबा दिल्यास स्वीकारणार का? शिवसेनेने दिले असे उत्तर...