दहशतवाद्यांचा मोठा कट ATSनं आणला उजेडात, तब्बल 7 हजार सिम कार्ड्स केले जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 04:28 PM2018-10-24T16:28:27+5:302018-10-24T17:52:34+5:30
संपूर्ण देशात दहशतवाद परसवण्याचा कट एटीएसनं उजेडात आणला आहे.
बिहार - झारखंडसहीत संपूर्ण देशात दहशतवाद परसवण्याचा दहशतवाद्यांचा कट एटीएसनं उजेडात आणला आहे. रांचीमध्ये या कटाचा खुलासा करण्यात आला आहे. पोलिसांच्या अनेक पथकांनी एकत्र येऊन रांचीतील वेगवेगळ्या परिसरात छापेमारी करत तब्बल 7 हजार सिम कार्ड जप्त केले आहेत. एटीएसनं दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या सिम कार्ड्सद्वारे दहशतवादी देशात सामाजिक तेढ निर्माण होतील, असे मेसेज व्हायरल करत होते. रांची पोलीस आणि सायबर पोलिसांनी रांचीतल कांटाटोलीतील हासिब इंक्लेवच्या फ्लॅट आणि कांकेतील भीठा परिसरातील एका घरावर छापेमारी केली.
या छापेमारीदरम्यान त्यांनी हजारोंच्या संख्येनं सिम कार्ड्स जप्त केली. शिवाय, सिम बॉक्स आणि मॉनिटरही ताब्यात घेतले. तसंच पोलिसांनी जवळपास 12 जणांना चौकशीसाठीही ताब्यात घेतलं आहे. मात्र या मागील मुख्य सूत्रधार जावेदपर्यंत पोलीस पोहोचू शकले नाहीत.
ताब्यात घेतलेला एक जण जावेदचा नातेवाईक आहे. याप्रकरणी छापेमारी करण्यात आलेल्या फ्लॅटच्या मालकाचीही पोलिसांनी चौकशी केली. दरम्यान, रांचीमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात सिम कार्ड्स जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सिम बॉक्सच्या माध्यमातून पाकिस्तान, बांगलादेश आणि अरब देशांमध्ये बातचित केली जात होती आणि मेसेजही पाठवले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. सिम बॉक्स आणि हजारो सिम कार्ड्सचा वापर करणाऱ्या टेरर कनेक्शनची चौकशी रांची पोलीस आणि एटीएसची टीम करत आहे.