1717 कोटी गेले पाण्यात; बिहारमध्ये गंगा नदीवरील पुल बांधण्यापूर्वीच कोसळला, घटनेचा VIDEO आला समोर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 08:30 PM2023-06-04T20:30:41+5:302023-06-04T20:31:21+5:30
चार वर्षांपूर्वीच CM नितीश कुमार यांनी पुलाची पायाभरणी केली होती. पुलाचे बांधकाम पूर्णही झाले नव्हते.
भागलपूर: बिहारमधील भागलपूरमध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली. येथे खगरिया-अगुवानी-सुलतानगंज दरम्यान गंगा नदीवर बांधण्यात येत असलेला पूल कोसळला. या अपघाताचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. 4 वर्षांपूर्वी सीएम नितीश कुमार यांच्या हस्ते पुलाची पायाभरणी झाली होती. 1717 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पुलाचा काही भाग दोन वर्षांपूर्वी पडला होता.
बिहारच्या भागलपूरमध्ये रविवारी खगरिया-अगुवानी-सुलतानगंज गावादरम्यान बांधण्यात येणारा निर्माणाधीन पूल कोसळला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवित झाली नसली तरी पूल कोसळल्याने घटनास्थळी घबराट पसरली. काही वेळातच संपूर्ण पूल गंगा नदीत विसर्जित झाला. आश्चर्याची बाब म्हणजे दोन वर्षांपूर्वीही या पुलाचा काही भाग कोसळला होता.
#UPDATE | The incident of under-construction bridge collapse happened at around 6 pm. No casualties reported till now. Local administration on the spot, we have asked for a report from 'Pul Nirman Nigam': DDC Bhagalpur Kumar Anurag to ANI https://t.co/MoeA7wF1nN
— ANI (@ANI) June 4, 2023
1717 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिलमध्ये आलेल्या वादळामुळेही या बांधकामाधीन पुलाचा काही भाग खराब झाला होता. बांधकामाधीन पुलाचा वरचा भाग कोसळल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र पूल कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुलाच्या तीन खांबांच्या वर बांधलेले बांधकाम कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. 4 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या पुलाची पायाभरणी केली होती.
विरोधी पक्षाने साधला निशाणा
बांधकामाधीन पूल कोसळल्याबद्दल विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा म्हणाले की, बिहार सरकारच्या भ्रष्टाचाराचा आणखी एक नवीन प्रकार समोर आला आहे. 2014 मध्ये 600-700 कोटी खर्च असलेल्या या पुलाची किंमत 1700 कोटींवर पोहचली. उच्च अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पैसे वसूल केले जात आहेत. याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. बिहारची जनता याला कधीच माफ करणार नाही.