बिहार बोर्डाच्या परीक्षेत ४८९ गुणांचा योगायोग, तर तब्बल ६० मुली टॉप १० मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:40 IST2025-03-29T15:39:41+5:302025-03-29T15:40:03+5:30
Bihar Board 10th Result: बिहारमधील बिहार शालेय परीक्षा मंडळाचा (बीईएसबी) दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या निकालानंतर आता संपूर्ण शैक्षणिक वर्तुळामध्ये ४८९ या क्रमांकाची खूप चर्चा होत आहे.

बिहार बोर्डाच्या परीक्षेत ४८९ गुणांचा योगायोग, तर तब्बल ६० मुली टॉप १० मध्ये
बिहारमधीलबिहार शालेय परीक्षा मंडळाचा (बीईएसबी) दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या निकालानंतर आता संपूर्ण शैक्षणिक वर्तुळामध्ये ४८९ या क्रमांकाची खूप चर्चा होत आहे. त्याचं कारण म्हणजे राज्यातील तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८९ गुण मिळाले असून, हे तिघेही संयुक्तरीत्या राज्यातून प्रथम आले आहेत. त्यामध्ये साक्षी कुमारी आणि अंशु कुमारी या दोन विद्यार्थिनी आणि रंजन वर्मा या विद्यार्थ्याचा समावेश आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पहिल्या १०मध्ये स्थान मिळवणाऱ्या एकूण १२३ विद्यार्थ्यांमध्ये ६० मुलींचा समावेश आहे.
पुनीत कुमार सिंह, सचिन कुमार राम आणि प्रियांशू राज यांनी ४८८ गुणांसह संयुक्तरीत्या तिसरा क्रमांक पटकावला आहे. पहिला पाच क्रमांकांमध्ये २५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर ६ ते १० या क्रमांकांमध्ये ९८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बिहारच्या दहावीच्या परीक्षेत पहिल्या १० क्रामांकांमध्ये १२३ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवलं आहे. त्यात ६३ विद्यार्थी आणि ६० विद्यार्थिनींचा समावेश आहे. गतवर्षी पहिल्या दहा क्रमांकांमध्ये ५१ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवलं होतं. तसेच त्यात २३ विद्यार्थिनींचा समावेश होता.
दरम्यान, बिहार बोर्डाने यावर्षी पहिल्या १० क्रमांकांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या पुरस्काराच्या रकमेमध्ये वाढ केली आहे. पहिला क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला २ लाख रुपये, एक लॅपटॉप आणि पदक दिलं जाईल. तर दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला १.५ लाख रुपये, एक लॅपटॉप आणि पदक दिलं जाईल. तर तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला १ लाख रुपये, लॅपटॉप आणि पदक देऊन सन्मानित करण्यात येईल. तर चौथ्या क्रमांकापासून दहाव्या क्रमांकापर्यंतच्या विद्यार्थ्यांना २० हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाईल.