1 मिनिट उशीर... बारावीच्या पेपरला न बसता आल्याने गोंधळ, लाठीचार्ज; ढसाढसा रडले विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 02:32 PM2024-02-01T14:32:33+5:302024-02-01T14:37:19+5:30

परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यास 1 मिनिट उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना आतमध्ये घेण्यात आलं नाही.

bihar board 12th exam 2024 missed students ruckus lathi charge girl students crying | 1 मिनिट उशीर... बारावीच्या पेपरला न बसता आल्याने गोंधळ, लाठीचार्ज; ढसाढसा रडले विद्यार्थी

फोटो - आजतक

बिहार बोर्डाची बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. बोर्डाच्या परीक्षेसाठी वर्षभर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कठीण काळ आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोहोचले. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. मधेपुरा आणि कैमूर जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांनी परीक्षेला येण्यासाठी उशीर झाला. विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर रडत आहेत. 

परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यास 1 मिनिट उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना आतमध्ये घेण्यात आलं नाही. यानंतर पालकांनी मधेपुरा येथील रस्त्यावर निदर्शने केली. याच दरम्यान, पोलिसांनी विद्यार्थी आणि पालकांवर लाठीचार्ज केला. बोर्डाच्या परीक्षेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या तीस मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे. 

मधेपुरा येथील ठाकूर प्रसाद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर 1 मिनिट उशीर झाल्यामुळे 100 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही.  विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप असून, आमच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. ट्रॅफिकच्या समस्येमुळे आम्हाला उशीर झाला, आम्ही 2 तासांपूर्वी घरून निघालो असं अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. विद्यार्थी रस्त्यावर सतत आंदोलन करत आहेत.

कैमूर जिल्ह्यातही इंटरमिजिएट परीक्षा सुरू असून मोहनिया शहरात इंटरमिजिएट परीक्षेसाठी एकूण 6 केंद्र देण्यात आली आहेत. या 6 केंद्रांवर 4200 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. परंतु उशिरा आल्याने 10 विद्यार्थिनी परीक्षेला मुकल्या आणि त्यांना केंद्रात प्रवेश देण्यात आला नाही. विद्यार्थिनी गेटजवळ उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यासमोर रडत होत्या. विनंती केली पण तरीही अधिकाऱ्यांनी सरकारी नियमांचा हवाला देत तिला प्रवेश दिला नाही.
 

Web Title: bihar board 12th exam 2024 missed students ruckus lathi charge girl students crying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.