बिहार - प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी बीएसएससीच्या अध्यक्षाला अटक
By admin | Published: February 24, 2017 06:52 PM2017-02-24T18:52:01+5:302017-02-24T19:07:38+5:30
बिहार कर्मचारी निवड आयोगा (बीएसएससी)कडून प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी एका वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि बिहार कर्मचारी निवड आयोगा (बीएसएससी)चे अध्यक्ष सुधीर
Next
>ऑनलाइन लोकमत
पटना, दि. 24 - बिहार कर्मचारी निवड आयोगा (बीएसएससी)कडून प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि बिहार कर्मचारी निवड आयोगा (बीएसएससी)चे अध्यक्ष सुधीर कुमार यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. सुधीर कुमार यांच्यासह त्यांचा भाऊ आणि दोन नातेवाईकांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.
सुधीर कुमार हे 1987 बॅचचे बिहार केडरचे आयएएस अधिकारी असून त्यांना झारखंडमधील हजारीबागमधून अटक करण्यात आली, तर त्यांचा भाऊ आवदेश कुमार आणि त्याच्या पत्नीला पटना येथील घरातून ताब्यात घेतले. सुधीर यांच्या पुतण्याला सुद्धा चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, बीएसएससीची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दहा ते बारा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी गेल्या काही दिवसांपूर्वी बीएसएससीचे सचिव परमेश्वर राम याला अटक केल्यानंतर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने त्याची तुरुंगात रवानगी केली.
राज्य सरकारच्या सचिवालयात सहाय्यकांच्या पदासाठी परिक्षेचं नियोजन करण्यात आले होते. यासाठी गेल्या महिन्यात 29 जानेवारीला पहिल्या टप्प्यात उमेदवारांची परीक्षा ठेवण्यात आली होती. त्यानंतर दुस-या टप्प्यासाठी 5 फेब्रुवारीला ठेवण्यात आली. मात्र, 29 जानेवारीलाच या परिक्षेची प्रश्नपत्रिका लीक झाली आणि सोशल मीडियात व्हायरल करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी अद्याप वेगवेगळ्या ठिकाणाहून आत्तापर्यंत 30 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.