Bihar By Election: बिहारचा निकाल धक्कादायक; नितीश-तेजस्वी सोबत मिळूनही भाजपला पराभूत करू शकले नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 07:03 PM2022-12-08T19:03:48+5:302022-12-08T19:04:47+5:30
Bihar By Election: बिहारच्या कु़डणीतील पोटनिवडणूक नितीशकुमारांसाठी प्रतिष्ठेची बनली होती.
Bihar By Election: गुजरात, हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका आणि मैनपुरी येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालांची देशभर चर्चा होत आहे. मात्र बिहारच्या कुडणी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल सर्वात धक्कादायक आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाचे जेडीयूचे उमेदवार मनोज कुशवाह यांचा पराभव झाला.
ही जागा नितीशकुमार यांच्या प्रतिष्ठेची बनली होती. आरजेडीसोबत सरकार स्थापन केल्यानंतर नितीश कुमार यांच्यासाठी ही पहिलीच निवडणूक होती. नितीश स्वतःला ईसीबीचे नेते समजतात. यासोबतच जेडीयू-आरजेडीच्या मतांची टक्केवारी जोडली, तर बिहारमध्ये महाआघाडी इतकी मजबूत होते की भाजप त्याच्यासमोर कुठेही टिकत नाही.
कुडणीत भाजपचे उमेदवार केदार प्रसाद गुप्ता यांनी नितीश कुमार यांचे जेडीयू उमेदवार मनोज कुशवाह यांचा 3,645 मतांनी पराभव केला आहे. गुप्ता यांना 76,653 तर कुशवाह यांना 73,000 मते मिळाली. दरम्यान, या जागेवर भाजपची रणनीती कामी आल्याचे मानले जात आहे. बिहारमध्ये 15 टक्के सवर्ण, 26 टक्के अतिमागास आणि 16 टक्के दलितांची मते एकत्र आली, तर कोणत्याही पक्षाला बिहार जिंकणे सोपे आहे. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपने असाच प्रयोग केला आहे.
कुटणीत पोटनिवडणूक का झाली ?
प्रवासी भत्ता घोटाळा प्रकरणी राजद आमदार अनिल साहनी यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना विधानसभा सदस्यत्व गमवावे लागले. यानंतर कुडणीत ही पोटनिवडणूक घ्यावी लागली. 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत साहनी यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी भाजपचे केदार गुप्ता यांचा सुमारे 700 मतांनी पराभव केला होता.