बिहारचे छपरा हिंसाचार प्रकरण: लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबीयांच्या अडचणींत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 09:56 AM2024-05-26T09:56:56+5:302024-05-26T09:58:07+5:30
राबडीदेवी यांचे सुरक्षा कर्मचारी जितेंद्र सिंह यांच्यावर आधी कारवाई झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : बिहारमधील छपरा येथे झालेल्या हिंसाचारामुळे राष्ट्रीय जनता दल (राजद) या पक्षाचे प्रमुख व माजी केद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या समोरील अडचणींत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सारणमधील राजदच्या उमेदवार रोहिणी आचार्य यांनी आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांना सरकारने दिलेले सुरक्षा कर्मचारी नेले होते. त्यासंदर्भात सुरक्षा कर्मचाऱ्यांवर आता कारवाई करण्यात येत आहे.
सारणचे पोलिस अधीक्षक गौरव मंगला यांनी दिलेल्या अहवालानुसार पाटणाचे एसएसपी राजीव मिश्रा यांनी आणखी दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच राबडीदेवी यांच्या तीन सुरक्षा रक्षकांनाही निलंबित करण्यात आले आहे. राबडीदेवी यांचे सुरक्षा कर्मचारी जितेंद्र सिंह यांच्यावर आधी कारवाई झाली. शनिवारी शिपाई आफताब, कृपानंदन यांना निलंबित करण्यात आले. हे दोघेही निवडणुकीच्या दिवशी रोहिणी आचार्य यांच्यासोबत होते.