देशात कधीही लोकसभेच्या निवडणुका लागू शकतात; विरोधी पक्षातील बड्या नेत्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 01:17 PM2023-06-15T13:17:26+5:302023-06-15T13:18:19+5:30

Lok Sabha Elections : सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी निवडणुकीची तयारी केली आहे. 

 Bihar Chief Minister Nitish Kumar has claimed that Lok Sabha Elections 2024 will be held before the coming year | देशात कधीही लोकसभेच्या निवडणुका लागू शकतात; विरोधी पक्षातील बड्या नेत्यांचा दावा

देशात कधीही लोकसभेच्या निवडणुका लागू शकतात; विरोधी पक्षातील बड्या नेत्यांचा दावा

googlenewsNext

Lok Sabha Elections 2024 Date : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आता एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्वच राजकीय पक्ष संभाव्य उमेदवारांची चाचपणी करत आहेत. अशातच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात बोलताना लवकरच निवडणुका होणार असल्याचे संकेत दिले. "अपूर्ण कामे लवकर पूर्ण करण्याची गरज आहे. निवडणुका कधी होणार हे कोणालाच माहिती नाही", असे त्यांनी म्हटले.

"देशात याच वर्षी लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. देशात कधी निवडणुका होतील, कोणालाच माहिती नाही. पण परिस्थिती जशी बनली आहे, त्यावरून असे दिसते की त्या कधीही होऊ शकतात", असेही नितीश कुमार यांनी सांगितले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. खरं तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या वक्तव्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य नुकतेच समोर आले आहे.

स्टॅलिन यांनी केला होता दावा 
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी लोकसभेच्या निवडणुकीबद्दल एक मोठा दावा केला होता. "कर्नाटकातील पराभवानंतर भाजप लोकसभा निवडणुकीची घोषणा आधी करू शकते. देशभरात भाजपचा प्रभाव कमी होत चालला आहे", असे एमके स्टॅलिन यांनी १० जून रोजी म्हटले होते. अलीकडेच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवत भाजपला सत्तेतून बाहेर केले. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी हा निकाल म्हणजे देशाचा मूड बदलण्याचा जनादेश असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, चालू वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा आणि मिझोरम या राज्यांचा समावेश आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. दुसरीकडे, तेलंगणामध्ये मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएसमोर कॉंग्रेस मुख्य प्रतिस्पर्धी असणार आहे. मिझोराममध्ये प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व आहे, त्यामुळे तिथे काँग्रेस आणि भाजपच्या जनादेशाचा फारसा परिणाम होणार नाही.

Web Title:  Bihar Chief Minister Nitish Kumar has claimed that Lok Sabha Elections 2024 will be held before the coming year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.