बिहार : नितीश कुमार लखपती, तर मुलगा कोट्यधीश; मंत्र्यांनी जाहीर केली संपत्ती
By जयदीप दाभोळकर | Updated: January 1, 2021 15:26 IST2021-01-01T15:23:01+5:302021-01-01T15:26:10+5:30
Bihar : बिहारच्या मुख्यमंत्र्यांसहित सर्व मंत्र्यांकडून जाहीर करण्यात आली मालमत्तेची माहिती.

बिहार : नितीश कुमार लखपती, तर मुलगा कोट्यधीश; मंत्र्यांनी जाहीर केली संपत्ती
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून एकूण ५७ लाखांची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. तर संपत्तीच्या तुलनेत त्यांच्या मुलाकडे म्हणजेच निशांत यांच्याकडे आपल्या वडिलांपेक्षा अधिक संपत्ती आहे. ३१ डिसेंबर रोजी नितीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे केवळ ३५ हजार रूपये रोख रकमेच्या स्वरूपात आहे. तर निशांत यांच्याकडे २८ हजार रूपये रोख आहेत. परंतु वडिलोपार्जित संपत्तींमुळे निशांत यांच्याकडे आपल्या वडिलांपेक्षा अधिक श्रीमंत आहेत.
बिहार मंत्रिमंडळाच्या विभागानं आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या संपत्तीच्या माहितीनुसार निशांत यांच्याकडे निरनिराळ्या बँकांमध्ये एक कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम आणि फिक्स्ड डिपॉझिट आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्याकडे फिक्स्ड डिपॉझिटही नाही. नितीश कुमार यांच्याकडे ११ लाख ३२ हजार रूपये किंमतीची एक फोर्ड कार आहे. तर त्यांच्या मुलाकडे ६.४० लाख किंमतीची एक ह्युंदाई कंपनीची गाडी आहे. निशांत यांच्याकडे आपल्या वडिलांकडे असलेल्या दागिन्यांपेक्षा अधिक दागिनेही आहेत. नितीश कुमार यांच्याकडे केवल एक सोन्याची अंगठी आणि एक चांदीची अंगठी आहे. या दागिन्यांची किंमत ९८ हजार रूपये इतकी आहे. तर निशांत यांच्याकडे तब्बल ३० तोळे सोनं आणि अन्य दागिनेही असून त्यांची किंमत २०.७३ लाख इतकी आहे.
याव्यतिरिक्त नितीश कुमार यांच्याकडे एक एसी, एक कंम्प्युटर, १२ गाय, ६ वासरं, व्यायामाची सायकल, शिवणकामाचं मशीन आणि एक मायक्रोव्हेव ओव्हनही आहे. तसंच त्यांचं दिल्लीतही एक घर असल्याचं देण्यात आलेल्या माहितीत नमूद केलं आहे. २०१८ च्या तुलनेत यावेळी त्यांच्याकडे रोख रक्कम कमी झाल्याचं दिसून येत आहे. २०१८ मध्ये त्यांच्याकडे ४२ हजार रूपये रोख होते. २०२० मध्ये त्यांच्याकडे ३५ हजार रूपये रोख असल्याचं सांगण्यात आलं आहे.