Bihar CM Nitish Kumar:नितीश कुमार असणार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार? प्रशांत किशोर यांनी लावली फिल्डींग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 03:40 PM2022-02-22T15:40:54+5:302022-02-22T17:31:06+5:30
मागील काही दिवसांत प्रशांत किशोर यांनी अनेक विरोधी नेत्यांच्या भेटी घेतल्या, त्या भेटींमध्ये राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
नवी दिल्ली: राष्ट्रपती पदासाठी या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत विरोधकांकडून अध्यक्षपदाच्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री आणि एनडीएमधील भाजपचे सहयोगी नितीश कुमार(Nitish Kumar) यांना विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार केले जाणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी यासाठी तयारी सुरू केली असून, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर(Prashant Kishor) योजना आखत असल्याची चर्चा आहे.
पीके आणि नितीश कुमार यांची भेट
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली दौऱ्यात प्रशांत किशोर यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रशांत किशोर यांनी देशातील प्रमुख विरोधी पक्षांना सोबत घेऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्ष बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येत आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी नवी दिल्लीत नितीश कुमार यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीबाबत नितीश कुमार यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी हसत सांगितले की, प्रशांत किशोर यांच्याशी त्यांचे जुने नाते आहे.
पीके आणि केसीआर यांच्या गुप्त चर्चा
अलीकडेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि प्रशांत किशोर यांची हैदराबादमध्ये भेट झाली होती. या बैठकीतच अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे. यावेळी राष्ट्रपती निवडणुकीबाबत सर्व विरोधी पक्षांना मंचावर आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच या पदासाठी सर्वांना मान्य असा चेहरा पुढे करण्यावर चर्चा झाली आहे. त्या चर्चेदरम्यान प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्याची कल्पना दिली, ज्यावर केसीआर सहमत झाले. सूत्रांच्या हवाल्याने असेही बोलले जात आहे की, दिल्लीत नितीश कुमार यांची भेट घेण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी पाटणा येथे रात्रीच्या जेवणात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी गुप्तपणे चर्चा केली.
पीकेंनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्यासाठी अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. प्रशांत किशोर यांनी बिहारमधील आरजेडी नेते तेजस्वी यादव, महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर याशिवाय पश्चिम बंगालमधील सत्ताधारी टीएमसीच्या नेत्यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या हवाल्याने असेही बोलले जात आहे की, प्रशांत किशोर नितीश कुमार यांच्याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सपा प्रमुख अखिलेश यादव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचीही भेट घेऊ शकतात.