“मला फोन केला नाही, पण पंतप्रधान मोदींनी याचे संपूर्ण श्रेय घ्यावे”; नितीश कुमारांची टोलेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 10:29 AM2024-01-25T10:29:21+5:302024-01-25T10:30:31+5:30
Nitish Kumar News: कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर केल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र सरकारचे आभार मानतो, असे नितीश कुमार यांनी सांगितले.
Nitish Kumar News: ज्येष्ठ समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. कर्पुरी ठाकूर यांचे मूळ गाव असलेल्या कर्पुरी ग्राम येथे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. कर्पुरी यांचे ज्येष्ठ पुत्र व राज्यसभा सदस्य रामनाथ ठाकूर यांची गावकऱ्यांनी भेट घेतली. याबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आनंद व्यक्त केला असून, प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदींना टोला लगावल्याचे सांगितले जात आहे.
कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नितीश कुमार यांनी त्यांच्या पक्षाने याबाबत सातत्याने मागणी केल्याची आठवण करून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र सरकारचे आभार मानतो, असे नितीश कुमार यांनी सांगितले. तसेच नितीश कुमार यांनी घराणेशाहीवर टीका केली. आपण कधीही घराणेशाहीला प्रोत्साहन दिले नाही. त्यामागे कर्पुरी ठाकुर यांची प्रेरणा आहे, असे नितीश कुमार म्हणाले.
मला फोन केला नाही, पण पंतप्रधान मोदींनी याचे संपूर्ण श्रेय घ्यावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फोन केला नाही, तर रामनाथ ठाकूर यांना फोन केला. मात्र, पंतप्रधानांचे अभिनंदन करतो. जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्यात आला ही आनंदाची बाब आहे. २००७ ते २०२३ पर्यंत दरवर्षी केंद्रातील काँग्रेस सरकार आणि विद्यमान सरकारला ही विनंती करण्यात आली होती. यंदा ती पूर्ण झाली. पंतप्रधानांचे आभार आणि अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे संपूर्ण श्रेय घ्यावे, असा टोला नितीश कुमार यांनी लगावला.
दरम्यान, कर्पुरी ठाकूर यांचे योगदान नव्या पिढीला प्रेरणादायी आहे, असे मत भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष के. लक्ष्मण यांनी व्यक्त केले. कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याचा निर्णय योग्य असल्याचे लक्ष्मण यांनी स्पष्ट केले. तर, काँग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले आहे. जातीय जनगणना करणे ही खऱ्या अर्थाने कर्पुरी ठाकूर यांना आदरांजली ठरेल, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.