I.N.D.I.A.च्या ऐक्यावर नितीश कुमारांचे मौन? तेजस्वी यादवांना म्हणाले, “तूच काय ते बोल”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 01:33 PM2023-09-18T13:33:01+5:302023-09-18T13:34:18+5:30
Nitish Kumar On I.N.D.I.A.: इंडिया आघाडीच्या ऐक्याबाबत प्रश्न विचारताच नितीश कुमार यांनी तेजस्वी यादवांना पुढे केले.
Nitish Kumar On I.N.D.I.A.: विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या तीन बैठका पार पडल्या. पहिली पाटणा, दुसरी बंगळुरू आणि तिसरी बैठक मुंबईत झाली. यामध्ये अनेकविध विषयांवर मंथन करण्यात आले. समन्वय समित्यांची स्थापना करण्यात आली. यातील एका समितीची महत्त्वाची बैठक भोपाळ येथे होणार होती. मात्र, ती झाली नाही. यानंतर आता विरोधकांच्या एकजुटीबाबत शंका उपस्थित करत असून, सत्ताधारी आणि एनडीए विरोधकांच्या ऐक्यावर सवाल करत आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इंडिया आघाडीच्या एकतेबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर नितीश कुमार यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना पुढे केले आणि उत्तर देण्यास सांगितले. मीडियाशी संवाद साधताना नितीश कुमार यांना इंडिया आघाडीच्या ऐक्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. नितीश कुमार यांनी पुढे केल्यावर, या मुद्द्यावर काही अडचण नाही. आम्ही बिहार आणि देशाच्या हितासाठी एकत्र आहोत, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले.
मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा भारत सरकारला अधिकार
नितीश कुमार यांनी अन्य काही मुद्द्यांवर उत्तरे दिली. संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत बोलताना, आमचे संसदेतील सर्व सदस्य सक्रिय आहेत. ते त्यांचा मुद्दा योग्य पद्धतीने मांडतील. केंद्र सरकारला संपूर्ण देशात लवकरच निवडणुका घ्यायच्या आहेत, आम्हीही वाट पाहत आहोत. जितक्या लवकर निवडणुका घेतल्या जातील तितके चांगले. लोकसभेच्या निवडणुका मुदतपूर्व घेतल्या जाऊ शकतात, तसे करण्याचा अधिकार भारत सरकारला आहे, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिली.
दरम्यान, बिहारमध्ये लवकरच निवडणुका होतील. भाजप बिहारमध्ये सत्ता स्थापन करेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला होता. यावर बोलताना, त्यांना लवकरच संपूर्ण देशात निवडणुका घ्यायच्या आहेत. आम्हीही तयार आहोत. निवडणूक झाल्यावर सर्व काही कळेल, असे सूचक विधान नितीश कुमार यांनी केले.