Corona virus : पटण्याच्या NMCH मध्ये कोरोना स्फोट, तब्बल 84 डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 12:00 AM2022-01-03T00:00:25+5:302022-01-03T00:00:42+5:30
बिहारची राजधानी पाटणा येथील NMCH मध्ये रविवारी 84 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
कोरोना व्हायरस संसर्गाने बिहारमध्ये भयंकर रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील NMCH मध्ये रविवारी 84 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयातील 194 डॉक्टरांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली होती. यांपैकी 84 डॉक्टरांना लागण झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. (Patna NMCH 84 doctors report positive)
या रुग्णालयात रविवारी एकाच वेळी 84 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची समस्या वाढली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने डॉक्टरांना लागण झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता 200 डॉक्टरांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. जेणेकरून कुणाला कुणाला संसर्ग झाला हे समजू शकेल. तसेच ज्या 84 डॉक्टरांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे त्यांत, अंडरग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट, ज्युनिअर डॉक्टर, सिनिअर डॉक्टर्सचा समावेश आहे.