धक्कादायक! आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, काही पोलीस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:03 IST2025-01-04T16:02:10+5:302025-01-04T16:03:16+5:30
Bihar Crime News: बिहारमधील दरभंगा जिल्ह्यामधील लहेरियासराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील अभंडा गावामध्ये एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला केला.

धक्कादायक! आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, काही पोलीस जखमी
बिहारमधील दरभंगा जिल्ह्यामधील लहेरियासराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील अभंडा गावामध्ये एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला केला. या जमावाने पोलिसांवर दगडफेक करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांकडून शस्त्रास्त्र हिसकावून घेण्याचाही प्रयत्न केला. या झटापटीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी दरभंगा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे.
यबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पोलिसांचे पथक कोर्टाच्या आदेशावर फरार आरोपी जितेंद्र कुमार यादव याला अटक करण्यासाठी घटनास्थळी आले होते. पोलिसांना त्याला अटक केली तेव्हा गावातील लोक संतप्त झाले. त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. तसेच पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तसेच जमावाने पोलिसांजवळील शस्त्रास्त्रेही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.
या संपूर्ण घटनेची माहिती जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी दरभंगा येथील सिटी एसपी अशोक कुमार आणि एसडीपीओ अमित कुमार यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी रवाना करण्यात आला. तसेच पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करून आरोपींची ओळख पटवून त्यांच्याविरोधात कारवाईची तयारी सुरू केली आहे.
या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा प्रकारचा हिंसाचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही. तसेच पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. सध्या या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर प्रशासनाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच हिंसाचारात सहभागी लोकांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.