बिहारमध्ये लोखंडी पुल आणि ट्रेनच्या इंजिनंतर आता चक्क तलाव चोरला; पोलिसही चक्रावले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 03:55 PM2024-01-01T15:55:49+5:302024-01-01T15:56:27+5:30
बिहारमध्ये यापूर्वी 60 फूट लांबीचा लोखंडी पुल आणि ट्रेनचे इंजिन चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
दरभंगा : बिहारमध्ये 60 फूट लांबीचा लोखंडी पुल आणि ट्रेनचे इंजिन चोरीला गेल्याची विचित्र घटना घडली होती. त्यानंतर आता बिहारच्या दरभंगा येथून चक्क तलाव चोरीला नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भूमाफियांनी एका रात्रीत हे कृत्य घडवून आणल्याची माहिती आहे. सध्या परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
तुम्हाला वाटत असेल की, तलाव चोरला म्हणजे तलावातले पाणी चोरुन नेले, पण असे नाहीये. सविस्तर माहिती अशी की, दरभंगा येथील युनिव्हर्सिटी पोलीस स्टेशन हद्दीतील नीम पोखर परिसरात भूमाफियांनी रात्रीच्या अंधारात गुपचूप तळ्यात मातीचा भराव करुन तलाव सपाट केला आणि तिथे झोपडी बांधून त्यावर कब्जा केला. परिसरातील लोकांनी याची माहिती दरभंगा सदरचे एसडीपीओ अमित कुमार यांना दिली. यानंतर एसडीपीओ स्वत: पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत भूमाफिया घटनास्थळावरून पळून गेले.
एसडीपीओ अमित कुमार यांनी स्वतः परिसरातील लोकांची विचारपूस केली, ज्यामध्ये हे तलाव सरकारी असून त्याचे व्यवस्थापन सुरू असल्याचे समोर आले. मत्स्यपालनापासून ते पाणथळ रोपांपर्यंत सर्वच गोष्टींची येथे लागवड केली जात होती, मात्र आता भूमाफियांनी तलावात मातीचा भराव करुन तलाव बुजून टाकला. दरभंगामधील जमिनीच्या वाढत्या किंमती पाहता भूमाफियांनी चक्क तलावावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.