Bihar Election 2020: बिहारमध्ये भाजपाचा शंखनाद; नड्डा म्हणाले, मोदी-नीतीश यांनी राजकारणाची संस्कृती बदलली
By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 11, 2020 05:57 PM2020-10-11T17:57:53+5:302020-10-11T18:03:44+5:30
नड्डा म्हणाले, शेतकरी कायदा आणून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची मुक्ती केली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या कष्टाचा हिशेब घेण्यासाठी जागो-जागी भटकावे लागणार नाही. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला. 70 वर्षांत त्यांनी (काँग्रेस) केवळ जातीच्या आधारावरच राजकारण केले, असेही नड्डा म्हणाले. (BJP, jp nadda)
पाटणा - भाजपाने रविवारी बिहार विधानसभा निवडणुकीचा शंखनाद केला. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी आज मोक्ष नगरी गया येथील गांधी मैदानातू व्हर्चुअलसोबतच (Virtual) अॅक्चुअल रॅलीलाही संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रशंसा करत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.
नड्डा म्हणाले, शेतकरी कायदा आणून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची मुक्ती केली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या कष्टाचा हिशेब घेण्यासाठी जागो-जागी भटकावे लागणार नाही. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला. 70 वर्षांत त्यांनी (काँग्रेस) केवळ जातीच्या आधारावरच राजकारण केले, असेही नड्डा म्हणाले.
नीतीश कुमारांनी बिहारचे चित्र बदलले -
नड्डा म्हणाले, एनडीए सरकारने शिक्षणासाठी अत्यंत उत्तम प्रकारे काम केले आहे. बिहारमध्ये एनडीए काळात 14 वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली गेली आहेत. आम्ही पाच वर्ष विद्यार्थ्यांसाठी वेगळे बजेट तयार केले. बिहारच्या विकासासाठी भाजपा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. तसेच नितिश कुमारांनी बिहारचे चित्र पालटले आहे. बिहारने अनेक आयएएस आणि आयपीएस दिले आहेत. तसेच विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले, की निवडणुका या विकासासाठीच होत असतात.
मोदीनी राजकारणाची संस्कृती बदलली -
नड्डा म्हणाले, नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांनी भारत आणि बिहारच्या राजकारणाची संस्कृती बदलली. काँग्रेस पक्ष जाती-धर्माच्या नावावर व्होट बँकेचे राजकारण करत होता. मात्र, मोदींनी देशातील राजकारणाची संस्कृती बदलली. तसेच एनडीएने बिहारसाठी अनेक विकासाच्या योजना सुरू केल्या.
नीतीश यांच्या हाती बिहारच्या नेतृत्वाची धुरा देणे आवश्यक -
भाजपा अध्यक्ष म्हणाले, देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या हातात सुरक्षित आहे. मात्र, बिहारचे नेतृत्व नीतीश यांच्या हातात सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बिहारमध्ये एनडीएचे सरकार आणण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रितपणे काम करावे लागणार आहे.
पूर्वीच्या बिहारमध्ये आणि आजच्या बिहारमध्ये मोठा फरक आहे. एनडीएच्या काळात बिहारमध्ये अनेक कामे झाली आहेत, होत आहेत. ही कामे अशीच सुरू ठेवण्यची जबाबदारी आपली आहे. यावेळी नड्डा यांनी एनडीएच्या काळात झालेल्या अनेक कामांची आठवणही जनतेला करून दिली.