'नितीश कुमारांना उप-पंतप्रधान बनवा', भाजप नेत्याची इच्छा, JDU ने दिली अशी प्रतिक्रिया...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:53 IST2025-04-10T14:51:58+5:302025-04-10T14:53:12+5:30
Bihar Election 2025 : आगामी बिहार विधानसभा निवडणूक नितीश कुमारांच्या नेतृत्वात लढली जाणार आहे.

'नितीश कुमारांना उप-पंतप्रधान बनवा', भाजप नेत्याची इच्छा, JDU ने दिली अशी प्रतिक्रिया...
Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्यातील राजकीय हालचालींना वेग येत आहे. सध्या राज्यात नितीश कुमारांच्या नेतृत्वातील NDA चे सरकार असून, यापुढेल निवडणुकाही त्यांच्याच नेतृत्वात लढणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. अशातच भाज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी नितीश कुमारांबाबत एक मोठी इच्छा व्यक्त केली आहे.
अश्विनी चौबे यांनी नितीश कुमारांना केंद्र सरकारमध्ये जबाबदारी मिळण्याबाबत भाष्य केले आहे. चौबे म्हणाले, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. बिहारमध्ये राम-लक्ष्मणाची जोडी आहे. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत. ते 20 वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे आता त्यांचा दर्जा मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा झाला आहे.
नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी, ही जोडी देशाला दिशा देत आहे. एनडीएचे उद्दिष्ट बिहारमध्ये 2025 च्या निवडणुका जिंकणे आहे. मला वाटते की, नितीश कुमारांना देशाचे उपपंतप्रधान बनवावे ही बिहारची इच्छा आहे, असे अश्विनी चौबे यांनी म्हटले.
जेडीयूची प्रतिक्रिया
चौबे यांच्या दाव्यावर जेडीयू नेते अभिषेक झा म्हणाले की, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. अश्विनी चौबे यांनी आपले विचार व्यक्त केले, पण बिहारच्या लोकांना नितीश कुमार यांचा चेहरा आवडतो. त्यांनी बिहारच्या लोकांची सेवा केली आहे. बिहारमधील जनता पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर मतदान करेल. बिहार निवडणुकीत नितीश कुमार एनडीएचे नेतृत्व करतील.