पाकिस्तानच्या विजयानंतर फटाके फुटले; पोलीस तपासात भलतेच प्रकरण समोर आले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 10:00 AM2021-10-27T10:00:17+5:302021-10-27T10:02:00+5:30
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतात काही ठिकाणी फटाके फुटले
पाटणा: टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं भारताचा धुव्वा उडवत १० गडी राखून विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून कधीच पराभूत न झालेल्या टीम इंडियाला यंदा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. यानंतर पाकिस्तानात एकच जल्लोष झाला. भारतातही काही ठिकाणी फटाके फुटले. त्याबद्दलच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. असाच एक प्रकार बिहारमध्ये घडला होता. त्यामुळे सोशल मीडियावर वादंग माजला. मात्र पोलीस तपासातून भलतीच माहिती समोर आली.
बिहारच्या किशनगंजमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यानंतर फटाके फुटले. त्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या. लोकांनी कमेंटमधून फटाके फोडले. अनेकांनी रोष व्यक्त केला. किशनगंजच्या माजी आमदारांनी फटाके फोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. प्रकरण तापताच पोलिसांनी तपास हाती घेतला. एका गैरसमजातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचं तपासातून उघडकीस आलं.
पाकिस्तानच्या विजयानंतर किशनगंजमध्ये आतषबाजी, असा मजकूर असलेली पोस्ट किशनगंज हलचल नावाच्या फेसबुक पेजवर रविवारी प्रसिद्ध झाली. थोड्याच वेळात पोस्ट व्हायरल झाली. किशनगंजच्या पोलीस अधीक्षकांनी तपासाचे आदेश दिले. पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आलं. त्याची चौकशीतून वेगळीच माहिती समोर आली.
पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या घराजवळ विवाह सोहळा संपन्न झाला. त्यामुळे फटाके फोडण्यात आले. मात्र पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचा मोठा गैरसमज झाला. पाकिस्तानी संघ जिंकल्यानं फटाके फोडले जात असल्याचं त्याला वाटलं. त्यानं लगेच फेसबुकवर पोस्ट केली. कोणत्याही पडताळणीशिवाय ही पोस्ट करण्यात आली. त्याबद्दल संबंधित व्यक्तीनं माफीनामा दिला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.