आजोबा पेन्शन आणायला गेले; ५२ कोटींचा बँक बॅलन्स पाहून चक्रावले; अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 03:58 PM2021-09-17T15:58:35+5:302021-09-17T16:04:32+5:30
पेन्शन आणायला बँकेत गेले असताना खात्यातील शिल्लक पाहून वृद्धाला धक्का
मुझफ्फरपूर: बँक खात्यात अचानक भरमसाठ रक्कम येण्याचे प्रकार बिहारमध्ये घडत आहेत. खगडिया, कटिहारनंतर आता मुझफ्फरपूरमध्ये अशाच प्रकारची घटना घडली आहे. एका वृद्धाच्या खात्यात अचानक ५२ कोटी रुपये जमा झाले आहेत. निवृत्ती वेतन आणण्यासाठी वृद्ध बँकेच्या शाखेत गेला असताना त्याला याची माहिती मिळाली. त्यामुळे त्याला आश्चर्याचा धक्का बसला.
मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे रामबहादूर शाह त्यांचं निवृत्ती वेतन आणण्यासाठी बँकेत गेले होते. बँक खात्यातील रक्कम तपासण्यासाठी शाह यांना तिथल्या एका कर्मचाऱ्यानं अंगठा लावण्यास सांगितलं. शाह यांनी अंगठा लावताच बँक कर्मचाऱ्याला धक्काच बसला. कारण शाह यांच्या खात्यात ५२ कोटींहून अधिक रक्कम होती. ही बातमी बघता बघता वणव्याप्रमाणे पंचक्रोशीत पसरली.
स्पीड किती आहे रे? नितीन गडकरी सुस्साट वेगानं मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेची चाचणी करतात तेव्हा...
घटनेची माहिती समजताच स्थानिक माध्यम प्रतिनिधींनी शाह यांना गाठलं. निवृत्ती वेतन खात्यात जमा झालंय का ते तपासण्यासाठी बँकेत गेलो असताना ही बाब समजल्याचं शाह यांनी सांगितलं. 'आम्ही शेती करून उदरनिर्वाह करतो. माझ्या खात्यात जमा झालेल्या रकमेपैकी काही रक्कम आम्हाला देण्यात यावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे. त्यामुळे आमचा वृद्धापकाळ चांगला जाईल,' अशी इच्छा शाह यांनी व्यक्त केली.
माझ्या वडिलांच्या खात्यात ५२ कोटी रुपये असल्याचं एकाएकी आम्हाला समजलं. यामुळे आम्ही त्रस्त आहोत. आम्ही गरीब आहोत. सरकारनं आम्हाला काहीतरी मदत द्यावी, असं शाह यांचा मुलगा सुजीतनं म्हटलं. शाह यांच्या खात्यात ५२ कोटी असल्याची माहिती स्थानिकांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. या प्रकरणी तपास सुरू असून वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल, असं कटरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज पांडे यांनी सांगितलं.