शाब्बास पोरी! वडिलांनी जमीन विकून शिकवलं; लेकीने कष्टाचं सोनं केलं, झाली ऑफिसर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 15:59 IST2024-12-14T15:58:31+5:302024-12-14T15:59:13+5:30
वडिलांच्या कष्टाचं लेकीने सोनं केल्याची कौतुकास्पद घटना घडली आहे.

शाब्बास पोरी! वडिलांनी जमीन विकून शिकवलं; लेकीने कष्टाचं सोनं केलं, झाली ऑफिसर
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करतात. काही जण शिक्षणासाठी खूप मेहनत घेतात. परिस्थितीसमोर हार न मानता जिद्दीने सर्व संकटांचा सामना करतात आणि आपलं ध्येय गाठतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. बिहारच्या पूर्णिया येथील एका साध्या शेतकऱ्याने आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आपली जमीन विकली.
वडिलांच्या कष्टाचं लेकीने सोनं केल्याची कौतुकास्पद घटना घडली आहे. BPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला, ज्यामध्ये प्रमोद यादव यांची मुलगी ब्यूटी कुमारीने BPSC मध्ये यश संपादन केलं. फायनान्शिअल ऑफिसर या पदावर निवड होऊन ब्यूटीने यश संपादन केलं आहे. तिने एका मुलाखतीत सांगितलं की, तिची पहिल्याच प्रयत्नात बीपीएससीमध्ये निवड झाली. तिला ११२ वा रँक मिळाला आहे, तिच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे.
ब्यूटी कुमारी रोज ८ तास अभ्यास करायची, याशिवाय तिला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. सलग दोनदा यूपीएससी परीक्षेत नापास झाल्यानंतर तिने बीपीएससी करण्याचा विचार केला आणि पहिल्याच प्रयत्नात बीपीएससी परीक्षेत निवड झाल्याचे ती सांगते. मात्र, ती आता थांबणार नसून ती यूपीएससी पास करून तिचं स्वप्न पूर्ण करणार आहे.
वडील प्रमोद कुमार आणि आई वीणा देवी यांनी सांगितलं की, त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत आहे. यामुळेच ते आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. एका सामान्य कुटुंबातील शेतकरी असलेल्या वडिलांनी तिला चांगलं शिक्षण देण्यासाठी आपली जमीन विकली आणि त्या पैशातून मुलीला शिक्षण दिलं.