मुलगी होताच नाराज वडिलांकडून आत्महत्येचा प्रयत्न; तलावात उडी घेतली अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 05:41 PM2021-10-13T17:41:20+5:302021-10-13T17:41:37+5:30
घरात चौथी मुलगी आल्यानं कुटुंबात नाराजी; तलावात उडी मारत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न
बगहा: बिहारच्या बगहामधील एका रुग्णालयात एका महिलेनं मुलीला जन्म दिला. मुलगी झाल्याचं समजताच महिलेच्या पतीनं आणि तिच्या सासूनं तान्हुलीला घरात घेण्यास नकार दिला. महिलेला आधीच तीन मुली आहेत. त्यामुळे आता मुलगा व्हावा अशी अपेक्षा कुटुंबाला होती. मात्र चौथ्यावेळीही मुलगी झाल्यानंच कुटुंबीय नाराज झाले. महिलेच्या पतीनं आत्महत्या करण्यासाठी थेट तलावात उडी घेतली.
बगहातील शास्त्रीनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रदीप साहनी यांची पत्नी रिता देवी यांनी रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ झाला. मुलगी झाल्यानं नातेवाईक संतापले. रिता १२ तास पतीची वाट पाहत होत्या. मात्र प्रदीप त्यांना घरी आणण्यासाठी गेले नाहीत.
मुलगी झाल्याचं समजताच प्रदीप साहनी यांनी गावातील तलावात उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिकांनी त्यांना वाचवलं. चौथ्या मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी मी करेन, असा शब्द रिता यांनी पती आणि सासूला दिला. रुग्णालय प्रशासनानंदेखील कठोर भूमिका घेतली. त्यानंतर प्रकरण निवळलं.
पत्नी मुलीसह घरी आल्यास त्यांना जीवे मारेन अशी धमकी प्रदीप साहनी यांनी दिली होती. यानंतर रुग्णालय प्रशासनानं रिता देवीच्या सासूची आणि पतीची समजूत काढली. रुग्णालय प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे दोघेही शांत झाले आणि लहान मुलीला घरी नेण्याची तयारी दर्शवली.