Bihar Flood: बिहारमधील पुरात बळी गेलेल्यांची संख्या २४ वर; ७५ लाख लोकांना जबर फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 02:23 AM2020-08-13T02:23:13+5:302020-08-13T06:49:48+5:30
नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सची (एनडीआरएफ) ३३ पथके राज्यात तैनात
पाटणा : बिहारात आलेल्या पुरातील बळींची संख्या २४ झाली असून, १६ जिल्ह्यांतील ७५ लाखांपेक्षा अधिक लोकांना पुराचा जबर फटका बसला आहे. बिहार सरकारच्या वतीने अधिकृतरीत्या ही माहिती देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, दरभंगा जिल्ह्यात १0 जण मृत्युमुखी पडले आहेत. मुजफ्फरपूरमध्ये सहा जण, चंपारनमध्ये चार जण, सरनमध्ये दोन जण आणि सिवानमध्ये दोन जण मृत्युमुखी पडले आहेत. पुराचा तडाखा बसलेल्या लोकांची संख्या ७५,0२,६२१ असल्याचे बिहार सरकारच्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. पुराच्या पाण्यात बुडाल्याने हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत, तर ६६ जनावरे दगावली आहेत.
सूत्रांनी सांगितले की, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सची (एनडीआरएफ) ३३ पथके राज्यात तैनात करण्यात आली आहेत. त्यांचे मदत व सुटका कार्य सुरू असून, आतापर्यंत १२,४७९ लोकांना मदत छावण्यांत हलविण्यात आले आहे.
शनिवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. भागलपूर, दरभंगा, पुर्णिया, मुंगेर आणि कोसी विभागांचा त्यांनी हवाई दौरा केला. गंडक बॅरेज काळजीपूर्वक हाताळण्याच्या सूचना नितीशकुमार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कोसी नदीच्या पूर्व कूसबंदीचीही त्यांनी पाहणी केली. तत्पूर्वी, सोमवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या पूर आढावा बैठकीला उपस्थिती लावली होती.