“श्रीराम देव नाही, माझा रामावर विश्वास नाही, ते केवळ एक पात्र”; माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 05:12 PM2022-04-15T17:12:59+5:302022-04-15T17:14:39+5:30
पूजापाठ केल्याने कोणी मोठे होत नाही. अनुसूचित जातीच्या लोकांनी ते बंद केले पाहिजे, असे माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
सिकंदरा: यंदाच्या श्रीराम नवमीचा उत्सव देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. देशातील काही ठिकाणी राम नवमी उत्सवात हिंसाचाराच्या घटना घडल्याने याला गालबोट लागले. यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. यातच आता एका माजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जाहीर भाषणात हे विधान केले आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. जमुई जिल्ह्यामधील सिकंदरा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मांझी यांनी आपल्या भाषणात प्रभू श्री रामचंद्रांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. प्रभू श्रीरामचंद्र काही देव नाही ते केवळ एक पात्र होते, माझा रामावर विश्वास नाही, असे मांझी यांनी म्हटले आहे. आपण रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकी आणि तुलसीदास यांना मानतो. राम काही देवा नव्हता. वाल्मिकी आणि तुलसीदास यांनी आपली गोष्ट सांगण्यासाठी एक पात्र बनवले, ते रामाचे होते, असेही ते म्हणाले.
महाकाव्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी सांगण्यात आल्यात
वाल्मिकी आणि तुलसीदास यांनी या पात्राच्या आधारे त्यांनी एक महाकाव्य रचले. या महाकाव्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी सांगण्यात आल्यात. त्या गोष्टी मी मानतो, मात्र मी रामाला मानत नाही, असे मांझी म्हणाले. पूजा केल्याने कोणी मोठे होत नाही. पाठपूजा करणे अनुसूचित जातीच्या लोकांनी बंद केले पाहिजे, असेही मांझी यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
दरम्यान, जे ब्राह्मण मांस खातात, मद्यप्राशन करतात अशा ब्राह्मणांपासून दूर राहिले पाहिजे. अशा ब्राह्मणांकडून पूजा आणि धार्मिक विधी करुन घेता कामा नये. तुम्ही पूजापाठ करणं बंद करा, असे आवाहन मांझी यांनी केले.