३ मुलींनी दिला आई वडिलांच्या तिरडीला खांदा; एकाचवेळी घरातून निघाली अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 05:52 PM2023-02-01T17:52:07+5:302023-02-01T17:52:28+5:30
आराच्या कतीरा मोहल्ल्यात भाजपा नेते निवृत्त प्रोफेसर महेंद्र सिंह आणि पत्नी प्रोफेसर पुष्पा सिंह राहत होते
आरा - बिहारच्या आरा इथं समाजाच्या जुन्या रुढी परंपरेला छेद देत ३ मुलींनी त्यांच्या आई वडिलांच्या तिरडीला खांदा दिला आहे. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. मुला-मुलींमध्ये आता काहीच फरक नाही. मुलीही आई वडिलांची सेवा करतात असं लोकं म्हणू लागली. ही घटना कतीरा मोहल्ल्याची आहे. जिथं ३० जानेवारीला रात्री स्थानिक भाजपा नेते आणि निवृत्त प्रोफेसर दाम्पत्याची त्यांच्या घरात घुसून काही अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने हत्या केली.
या जोडप्याच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करून बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत प्रोफेसर आणि त्यांची पत्नी या दोघांवर हिंदू प्रथा परंपरेनुसार अंत्यविधी करण्यात आला. मृत प्रोफेसरच्या तीन विवाहित मुली रक्षिता सिंह, हर्षिता सिंह आणि अंकिता सिंह यांनी मुलाचं कर्तव्य निभावत आई वडिलांच्या तिरडीला खांदा दिला. यावेळी तिघांचे पतीही हजर होते. जावयांनी आई वडिलांसमान सासू-सासऱ्यांना शेवटचा निरोप दिला.
घरातून एकाचवेळी निघालेली पती-पत्नीची अंत्ययात्रा पाहून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. याठिकाणी भाजपा नेत्यांनी पक्षाचे सदस्य असलेल्या निवृत्त प्रोफेसर महेंद्र सिंह यांच्या पार्थिवावर भाजपाचा झेंडा अर्पण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर मोठ्या प्रमाणात स्थानिक लोक प्रोफेसर दाम्पत्याच्या अंत्ययात्रेला उपस्थित होते.
या जोडप्याच्या शेजारी राहणारे विजय सिंह यांनी अंत्ययात्रेतील दृश्य पाहून म्हटलं की, आज समाजात मुलगा-मुलगी दोघांमध्ये काही फरक नाही. मुली आई वडिलांची सेवा करतात. त्यामुळे आई वडिलांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार मुलींनाही मिळण्याचं स्वातंत्र्य धर्मामध्ये द्यायला हवं. प्रोफेसर महेंद्र सिंह उच्चशिक्षित होते. त्यांच्या मुलींना आई वडिलांच्या तिरडीला खांदा देऊन समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला.
काय आहे घटना?
आराच्या कतीरा मोहल्ल्यात भाजपा नेते निवृत्त प्रोफेसर महेंद्र सिंह आणि पत्नी प्रोफेसर पुष्पा सिंह राहत होते. सोमवारी रात्री त्यांच्या घरात अज्ञात लोकं घुसली आणि त्यांनी प्रोफेसर दाम्पत्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्या हल्ल्यात दोघेही मृत्युमुखी पडले. आरा शहरातील सर्वात पॉश परिसरात घडलेल्या या घटनेने सगळीकडे खळबळ माजली. प्रोफेसर महेंद्र सिंह हे भाजपाचे स्थानिक वजनदार नेते होते. ते कुंवर सिंह विश्वविद्यालयात डीन म्हणून काम करत होते.
प्रोफेसर दाम्पत्याच्या हत्येला ४८ तास उलटले तरीही अद्याप या घटनेतील गुन्हेगारांना शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या घटनेचा तपास एसपी प्रमोद कुमार यादव यांच्या देखरेखीत सुरू आहे. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने चौकशी केली जात आहे. या हत्येतील आरोपींना पकडण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत.