बापरे! ऑर्डर केला ड्रोन, घरी आल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 08:31 AM2023-05-19T08:31:41+5:302023-05-19T08:32:16+5:30
एका व्यक्तीने ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून ड्रोन ऑर्डर केला होता. पण, जेव्हा वस्तूची डिलिव्हरी झाली आणि त्याने पार्सल उघडले तेव्हा त्याला मोठा धक्काच बसला.
बिहारमधील गया येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून ड्रोन ऑर्डर केला होता. पण, जेव्हा वस्तूची डिलिव्हरी झाली आणि त्याने पार्सल उघडले तेव्हा त्याला मोठा धक्काच बसला. यानंतर त्याने डिलिव्हरी बॉयला सांगितले की त्याने ही वस्तू अजिबात ऑर्डर केली नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, गया येथील शादत यांनी 10 मे रोजी ऑनलाईन ड्रोनची ऑर्डर दिली होती. त्याची किंमत 7999 रुपये होती.
ड्रोनची डिलिव्हरी 17 मे रोजी होणार होती. डिलिव्हरी बॉयने पार्सल वेळेवर आणले आणि व्यक्तीने देखील त्याचे पैसे दिले. यानंतर त्याने पार्सल उघडण्याची इच्छा व्यक्त केली असता डिलिव्हरी बॉयने ते आपल्या मोबाईल कॅमेऱ्याने रेकॉर्डही केले. पार्सल उघडले असता त्यात पाण्याच्या दोन रिकाम्या बाटल्या होत्या. यानंतर डिलिव्हरी बॉयने कोणाशी तरी फोनवर बोलून पैसे परत करून पार्सल घेतले.
ड्रोन ऑर्डर केलेल्या व्यक्तीने कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणतेही उत्तर मिळाले नाही. ऑनलाईन शॉपिंगची अशी प्रकरणे नेहमीच पाहायला मिळतात. ऑफर आणि वेळेची बचत यामुळे ग्राहक ऑनलाईन खरेदीला अधिक पसंती देतात. तथापि, काही प्रकरणांमध्ये असे दिसून येते की लोक काहीतरी ऑर्डर करतात आणि डिलिव्हरी वेगळ्याच गोष्टीची होते.
हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात जानेवारी महिन्यात असेच एक प्रकरण समोर आले होते. येथे एका तरुणाने ऑनलाईन शॉपिंग करून लॅपटॉप ऑर्डर केला होता. यानंतर तो दिवसही आला ज्याची तो आतुरतेने वाट पाहत होता, पण जेव्हा त्याने पार्सल उघडले तेव्हा धक्काच बसला. विकास शर्मा यांनी सांगितले की, त्यांनी एका खासगी कंपनीच्या अॅपवरून लॅपटॉप ऑर्डर केला होता. त्याची किंमत 65 हजार रुपये होती. यामध्ये लॅपटॉप, बॅग, कीबोर्ड आणि माऊस मागवण्यात आले. पार्सल घरी आले आणि त्याने उघडले तेव्हा त्याला धक्काच बसला. त्यात लॅपटॉप नव्हता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.